महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी मेळावा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने केले आयोजन


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग सक्षमा प्रकल्पांर्गत महिला दिनानिमित्त महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन बुधवार दि.५ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. पिंपरी कॉलनी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाजवळील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे होणाऱ्या या मेळाव्यात सक्षमा प्रकल्पातील महिलांना सहभागी होता येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे या मेळाव्यामध्ये स्वयं सहाय्यता बचत गटांना मार्गदर्शन करणार आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील हे ‘स्वयं सहाय्यता बचत गट पुढील वाटचाल’ या विषयावर आणि समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध महिला योजनांची माहिती देणार आहेत.

याशिवाय महिलासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात विविध सांस्कृतिक व मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये टाटा स्ट्राईव्हच्या फिल्ड समन्वयक निशा निमसे व त्यांचे सहकारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. त्यानंतर टाटा स्ट्राईव्हच्या अजिता कर्वे या ‘सक्षमा प्रकल्प माहिती व साध्य’ या विषयावर, टाटा मोटर्स गृहिणी विभागाच्या अध्यक्षा शिल्पा देसाई ‘व्यवसायवृद्धी व मार्केट लिंकेज’ विषयावर, टाटा स्ट्राईव्हच्या सल्लागार अनिता राजन या ‘महिला सक्षमीकरण’ विषयावर, टाटा स्ट्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी हे ‘घे भरारी’ विषयावर, टाटा ऑटोकॉम इंटेरिअर आणि प्लास्टिक डिझाईनच्या एचआर हेड स्मिता जाधव या ‘महिला एकत्रीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी यशस्वी महिलांचा सत्कार समारंभ, यशस्वी महिलांचे मनोगत, टाटा गृहिणींची यशस्वी गाथा असे विविध कार्यक्रम देखील होतील.










