पीएमआरडीएच्या संयुक्त मोहिमेत २०१ अतिक्रमणे काढली
अतिक्रमण हटावा मोहिमेचा पहिला दिवस : वीस हजार चौरस फुटापर्यंतचा रस्ता मोकळा


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाहतूक कोंडीतून पुणेकरांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि.३) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने २०१ अतिक्रमणे काढण्यात आली. या अतिक्रमण निष्कासन मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तीन प्रमुख मार्गावर सकाळपासून कारवाईचा धडाका सुरु होता. त्यामुळे दिवसभरात एकूण २० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक विविध भागातील अतिक्रमणावर हातोडा पडला.


पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यमार्गावर होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी संबंधित भागात आगामी ३० दिवसात रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले अनधिकृत व अतिक्रमित दुकाने, गाळे, बांधकामे आदींवर लक्ष्य करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पीएमआरडीए, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक पोलीस विभाग, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागाने संयुक्त कारवाईसाठी वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार अतिक्रमण निष्कासन मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी संयुक्तपणे एकूण २०१ अतिक्रमणात २० हजार १०० चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. यात पुणे नाशिक रोडवरील इंद्रायणी नदी ते बर्गे वस्ती भागात ७८, पुणे सोलापूर रस्त्यावर ७० तर चांदणी चौक पौड रस्त्याच्या दोन्ही बाजूचे एकूण ५३ अतिक्रमणे काढण्यात आली.

महामार्ग, राज्यमार्गाच्या रस्त्यालगतची दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे संबंधितांनी स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात येत आहे. नागरिकांसह वाहनधारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गत आठवडयात प्राधिकरण कार्यालयात विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत कारवाईचे निर्देश दिले होते. संबंधित कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी- पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पीसीएमसीच्या कार्यकारी अभियंता शैलेजा पाटील, पीएमसीचे कार्यकारी अभियंता सदानंद लिटके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कारवाई केली.
३ मार्चला झालेल्या कारवाईची आकडेवारी
१) पुणे नाशिक रोडवरील इंद्रायणी नदी ते बर्गे वस्ती भागातील ३ कि.मी. अंतरात एकूण ७८ कारवाया करण्यात आल्या असून त्यांचे अंदाजे क्षेत्रफळ ७८०० चौरस फूट आहे.
२) पुणे सोलापूर रस्त्यावरील १.५ कि.मी. अंतरातील एकूण ७० कारवाया करत अंदाजे एकूण ७००० चौरस फूटावरील अतिक्रमण काढण्यात आली.
३) चांदणी चौक पौड रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या साडेतीन किलोमीटरपर्यंतचे ५३०० चौरस फूटाचे अतिक्रमण काढत एकूण ५३ कारवाया करण्यात आल्या.
४) तिन्ही रस्त्यावरील रस्त्यावर एकूण २०१ कारवाया करत एकूण २० हजार १०० चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण पीएमआरडीएच्या पथकांच्या माध्यमातून ३ मार्च रोजी काढण्यात आले.










