लोणावळ्यात अनधिकृत टपऱ्यांवर कारवाईबाबत आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली बैठक


लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोणावळा शहरातील अनधिकृत टपऱ्यांवर होणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत टपऱ्यांच्या अतिक्रमणाबाबत आणि त्यावर होणाऱ्या कारवाईसंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. शहरातील टपऱ्यांविषयी नागरिकांच्या तक्रारी निवडणुकीपूर्वीच समोर आल्या होत्या. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये आयोजित जनसंवाद दौऱ्यादरम्यानही वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. त्यानुसार, नगरपरिषदेने अशा अनधिकृत टपऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.
दहापेक्षा अधिक वर्षे अस्तित्वात असलेल्या टपऱ्यांना संरक्षण
बैठकीत ठरवण्यात आले की, नगरपरिषदेच्या जागेतील १० ते १५ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या आणि टपरी संघटना व नगरपरिषदेकडे अधिकृत नोंद असलेल्या टपऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तसेच, हॉकर्स झोनच्या माध्यमातून पुनर्वसन होईपर्यंत या टपऱ्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना नगरपरिषदेला देण्यात आली.


अनधिकृत अतिक्रमण आणि बेकायदेशीर भाडेप्रकरणी कठोर कारवाई

नगरपरिषदेच्या जागेवर जबरदस्तीने शेड उभारून भाडे घेत असेल, टपऱ्या बेकायदेशीररित्या भाड्याने दिल्या जात असतील किंवा अधिकृत नोंद असलेल्या जागेव्यतिरिक्त अतिक्रमण केलं जात असेल, अशा प्रकरणांवर निर्णयपूर्वक कारवाई करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. बैठकीत नगरपरिषदेच्या कारवाईवरही आक्षेप नोंदवण्यात आला. कारवाई हेतुपुरस्पर केली जात असून, पहिली कारवाई गोरगरीब टपरीधारकांवर केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोणत्या टपऱ्यांवर कारवाई करायची, याबाबत आधी सर्वेक्षण करून ठोस निर्णय घ्यावा, अशी सूचना नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. बैठकीत ठरवण्यात आले की, ज्या गोरगरीब टपरीधारकांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हीच टपरी आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. तसेच, राजकीय कारणास्तव कोणत्याही गरजू व्यक्तीवर अन्याय होऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस सूर्यकांत वाघमारे, विलास बडेकर, वसंतराव काळोखे, नारायण पाळेकर, दत्तात्रय येवले, अरुण लाड, देविदास कडू, निखिल कविश्वर, संजय भोईर, जीवन गायकवाड, परेश बडेकर, मंजू वाघ, उमा मेहता, आरोही तळेगावकर, कमलसिंह म्हस्के, रविंद्र पोटफोडे, बाबासाहेब ओव्हाळ, अमित भोसले यांसह मोठ्या संख्येने टपरीधारक उपस्थित होते.
“डीपीडीसी निधी कोण आणतो हेही ठाऊक नाही, हे दुर्दैव” – आमदार सुनील शेळके यांचा विरोधकांवर हल्लाबोल
मागील वीस-पंचवीस वर्षे नगर परिषदेत सत्तेवर राहूनही काही जणांना डीपीडीसी निधी कसा आणि कोणी आणतो, हे समजत नाही, हेच त्यांचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांवर टीका केली. नाव न घेता त्यांनी विरोधकांना लक्ष करत, लोणावळ्यातील विकासकामांमध्ये त्यांनी केलेल्या योगदानाचा परामर्श घेतला.
आमदार शेळके यांनी स्पष्ट केले की, २०१२ पासून उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती मिळाली नव्हती. मात्र, आमदार झाल्यानंतर त्यांनी हे प्रकल्प हाती घेतले आणि आता ९०% काम पूर्ण झाले आहे. गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी मिळवून ते सुरू केले. तसेच, शहरातील रस्त्यांवर बसवलेले पथदिवे आणि नव्याने उभारलेले पूल डीपीडीसी निधीतूनच साकारले आहेत. नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी २२ कोटींच्या निधीतून अत्याधुनिक पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू आहे. विरोधकांना हे निधी कोणाच्या प्रयत्नातून मिळाले, याची कल्पनाही नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
“२०१९ साली १३,००० तर २०२४ ला १८,००० मतांनी विजय”
मी काम केल्यामुळेच २०१९ मध्ये १३,००० आणि २०२४ मध्ये तब्बल १८,००० मतांनी विजय मिळवला. ही मतदारांनी माझ्या कामावर दिलेली पोचपावती आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. लोणावळा शहरात १९३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी निधी मंजूर झाला असून, ती कामे वेगाने सुरू आहेत. खंडाळ्यात शाळा इमारतीसाठी नगर परिषदेला भूखंड विकत घेतल्याचे विरोधकांना माहिती नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आणि सीसीटीव्ही प्रकल्प”
शहरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याच्या कामासाठी २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, शहरात सीसीटीव्ही बसवण्याच्या योजनेवर अहवाल तयार असून, लवकरच हे कॅमेरे सर्व प्रमुख रस्त्यांवर बसवले जातील. लोणावळ्याजवळील लायन्स पॉईंट येथे तब्बल ३५० कोटी रुपयांचा ग्लास स्कायवॉक उभारला जाणार असून, त्यासाठी रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. भांगरवाडी उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या कामांचे श्रेय मला मिळू नये म्हणून काही मंडळी जाणूनबुजून अडथळे निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
“राजकीय स्टंटबाजी थांबवा, लोणावळ्याच्या जनतेला न्याय द्या”
“मागील १५-२० वर्षे सत्तेत असताना विकासकामे केली असती, तर मला वारंवार आढावा बैठका घ्यायची गरज भासली नसती. जेव्हा अधिकार होते, तेव्हा काहीच केले नाही आणि आता स्टंटबाजी केली जात आहे. नगर परिषदेमधील तुमची ‘दुकानदारी’ बंद करा आणि जनतेला न्याय द्या,” असा थेट इशाराही शेळके यांनी विरोधकांना दिला आहे. मी एखादे विकास काम मंजूर करून आणत करत असेल तर आपण हे सत्ताधारी पक्षाचे आहात आपण देखील आपल्या जवळच्या मंत्र्याकडून किंवा नेत्याकडून निधी आणत शहरातील दुसरे विकास काम मार्गी लावावे व शहराच्या विकासाला हातभार लावावा. केवळ राजकीय स्टंटबाजी करून दुकानदारी चालू नये.










