मानाच्या विड्याची बोली लावलेले भाविक जगदीश श्रीपती जाधव (सस्ते) नागेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक
मानाचा वैभवी विडा २५ लाख रुपयांना


मोशी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उत्सवाच्या लिलाव बोलीमध्ये लाख रुपयांपासून सुरू झालेली बोली तब्बल २५ लाखांवर येऊन थांबली आणि तिसरा अंतिम पुकार झाला. यात मानाचा वैभवी विडा २५ लाख रुपयांना गेल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी मंदिरात भाविक, ग्रामस्थांनी टाळ्यांचा गजर केला. मानाच्या विड्याची बोली लावलेले भाविक जगदीश श्रीपती जाधव (सस्ते) नागेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.


मोशी येथील नागेश्वर महाराज यात्रा व भंडारा उत्सवाच्या निमित्ताने यात्रेतील लिलाव प्रथा उत्साहात पार पडली. मोशीत उत्सवास महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली असून, शुक्रवारी (दि. २८) परंपरागत लिलाव श्रीनागेश्वर महाराज मंदिर सभागृहात झाला. उत्सवात वापरलेल्या व महाराजांच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव जवळजवळ दीड कोटींच्या वर गेला.

मानाची ओटी रोहिदास विष्णू हवालदार यांनी बोली लावून तब्बल १७ लाख ५२ रुपयांना मिळवली. तर, लिलावात शेवटचे लिंबू फळ आकाश विष्णू सस्ते यांनी बोली लावून तब्बल ११ लाख १०१ रुपयांना मिळवले. तर मानाचे पहिले लिंबू भालचंद्र दत्तोबा बोराटे यांनी १७ लाख ५१ हजार रुपयांची बोली लावून घेतले. या लिलावात बोली लावण्याचा मान केदारी कुटुंबास असून केदारी परिवाराने लिलावाचे काम पाहिले.
नागेश्वर महाराजांबाबत मोशीकरांची मोठी श्रद्धा असून वस्तूंच्या लाखोच्या बोलीतून श्रद्धा व्यक्त होताना दिसून येते. परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी पार पाडले. त्यानंतर नागेश्वर महाराज सभा मंडपामध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून लिलाव उत्सव सुरू झाला. दरवर्षी लिलावात भाविकांना अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू, भंडाऱ्यातील प्रसाद व वस्तूंची बोली लावून लिलाव होतो. ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनविण्याची भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.










