बोलक्या भिंती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळाली चालना
विद्यार्थ्यांनी शाळेच्या भिंतीवर रेखाटली रंगबेरंगी चित्रे, शाळेमधील भिंती झाल्या बोलक्या


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाळेच्या भिंती केवळ चार भिंती नसतात, तर त्या ज्ञान, सर्जनशीलता आणि प्रेरणांचा खजिना असतो. या भिंती आता ‘बोलक्या भिंती’ या उपक्रमामुळे बोलक्या झाल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची, विचार करण्याची आणि स्वतःच्या कल्पनांना रंग देण्याची संधी देत आहेत. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांची सर्जनशीलता विकसित व्हावी आणि शाळेचे वातावरण अधिक आनंददायी व्हावे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले.


महापालिकेच्या चिंचवड येथील मरहूम फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेमध्ये आकांक्षा फाऊंडेशन व शाळा व्यवस्थापन समितीच्या १५ सदस्यांच्या सहकार्याने प्रायोगिक तत्वावर बोलक्या भिंती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगिता बांगर, मुख्याध्यापक अब्दुस सलाम इनामदार, पर्यवेक्षिका हमिदा मोमीन, सुनंदा मगर यांच्यासह शाळेतील शिक्षक, आकांक्षा फाऊंडेशनचे प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्य तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शाळेच्या भिंतीवर रेखाटली विविध प्रकारची रंगीबेरंगी चित्रे
बोलक्या भिंती उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः चित्रं काढून शाळेच्या भिंती रंगीबेरंगी केल्या आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची निसर्गचित्रे, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे आणि प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांनी भिंतींवर रेखाटली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ कलागुणच नव्हे, तर एकत्रित काम करण्याची भावना निर्माण झाली आहे. याशिवाय शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना रंगसंगती, रेखाटन आणि भिंतींवर चित्रे काढण्याच्या तंत्राचे प्रशिक्षण देखील देत आहेत. यामध्ये त्यांना आकांक्षा फाऊंडेशनच्या सदस्यांचीही मदत लाभत आहे. या उपक्रमामध्ये पालकांनाही सहभागी करून घेण्या येत असून शाळेच्या भिंती सुंदर झालेल्या पाहून पालकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच काही पालकांनी या उपक्रमासाठी शाळेला सहकार्य करण्याची तयारी देखील दर्शविली आहे.
बोलक्या भिंती उपक्रम हा केवळ शाळा सौंदर्यासाठी राबविण्यात येणार नसून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सर्जनशील विकासासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे. भिंतींवरील विविध प्रेरणादायी संदेश, रंगसंगती, रेखाटने यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल आणि त्यांना विविध गोष्टी शिकण्यात अधिक आनंद मिळेल. पालकांचा सहभाग हा या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे, कारण यामुळे शाळा आणि पालक यांच्यातील नाते अधिक दृढ होईल. सध्या प्रायोगिक तत्वावर एका शाळेमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून कालांतराने इतर महापालिका शाळांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
-प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
महापालिका शाळेमध्ये ‘बोलक्या भिंती’ हा उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणच नव्हे, तर त्यांच्या सर्जनशीलतेलाही चालना मिळेल. चित्रे, विविध माहितीपर मजकूर आणि आकर्षक रंगसंगतीमुळे मुलांच्या कल्पकतेला अधिक चालना मिळेल. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाच्या पद्धतीत एक सकारात्मक बदल घडून येईल आणि मुलांमध्ये शाळेबद्दल आकर्षण निर्माण होण्यास मदत मिळेल.
-विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
बोलक्या भिंती या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना शिकण्याची नवी प्रेरणा मिळेल. चित्रांच्या आणि रंगसंगतींच्या माध्यमातून मुलांना अवघड संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगता येतील. शिवाय, शाळेचे वातावरण अधिक प्रेरणादायी आणि आनंदी राहील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत यायला अधिक उत्साह वाटेल. अभ्यासाबरोबरच कला, सर्जनशीलता आणि नवकल्पनांना वाव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सलाम इनामदार, मुख्याध्यापक, मरहूम फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळा, चिंचवड










