स्वतःला जाणून घेण्याचे विज्ञान म्हणजे अध्यात्म – रिता कलावार


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) ‘स्वतःला जाणून घेण्याचे विज्ञान म्हणजे अध्यात्म होय!’ असे प्रतिपादन इस्त्रोतील माजी कर्मचारी आणि ज्येष्ठ योगसाधक रिता कलावार यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.


शिवशंभो फाउंडेशन आयोजित महाशिवरात्री महोत्सव २०२५ अंतर्गत तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेतील ‘विज्ञान व अध्यात्म’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना रिता कलावार बोलत होत्या. ज्येष्ठ उद्योजक नितीन काकडे, पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, शामराव मोरे, किशोर सूर्यवंशी, विजय महल्ले, सोमनाथ कुईटे, शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे, अध्यक्ष संजय तोरखडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

केशव घोळवे यांनी प्रास्ताविकातून, ”इवलेसे रोप लावियले द्वारी अन् त्याचा वेलू गेला गगनावेरी’ या वचनाचा प्रत्यय आम्ही घेत आहोत. सुमारे तेवीस वर्षांपूर्वी कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून शिवशंभो फाउंडेशनच्या लावलेल्या रोपट्याने आता भव्य रूप धारण केले आहे!’ अशी भावना व्यक्त केली. राजाभाऊ गोलांडे यांनी, ‘शिवशंभो फाउंडेशनच्या परिसराचे लोकसहभागातून देवभूमीत रूपांतर झाले आहे!’ असे गौरवोद्गार काढले.
रिता कलावार पुढे म्हणाल्या की, ‘शांत चित्ताने एका जागी स्थिर बसून मनात येणाऱ्या अनेक विचारांवर नियंत्रण मिळवीत मनाची केलेली निर्विकार अवस्था म्हणजे योग होय. भारतीय अध्यात्माची परंपरा खूप प्राचीन असूनही त्याला जागतिक मान्यता नव्हती; परंतु आता त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने जगाला त्याचे महत्त्व कळले आहे. भौतिक गोष्टींचा विचार न करता अंतर्मनातील शक्तीला जागृत केल्यास सुखद गोष्टी, आनंद, समाधान यांची सहजपणे अनुभूती येते. प्रत्येक व्यक्तीला स्थूल आणि सूक्ष्म शरीर लाभलेले असते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्या स्थूल अन् सूक्ष्म शरीरातील बदल आणि बिघाड शोधून त्यावर उचित उपचार करता येऊ शकतात. ‘ज्ञानेश्वरी’त वर्णन केलेल्या आभामंडळाचे आता छायाचित्र घेऊन आपल्याला होणारे संभाव्य विकारदेखील शोधून काढता येतात. त्यामुळे सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून आपल्या स्थूल शरीराला आपण तटस्थपणे नियंत्रित करू शकतो. तसेच ध्यानातून विज्ञान आणि अध्यात्म जोडले जाऊ शकते!’ दृकश्राव्य माध्यमातून कलावार यांनी विषयाचे विवेचन केले.
महाशिवरात्री महोत्सवात सकाळी शिशूगट ते इयत्ता नववीपर्यंत चार गटातून सुमारे साडेचारशे विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला; तसेच सायंकाळी विविध गुणदर्शन स्पर्धेत ‘थोर व्यक्तींची वेषभूषा आणि त्यांनी दिलेला संदेश’ या विषयावर बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
शिवशंभो फाउंडेशनचे सचिव राजेश हजारे, खजिनदार काळुराम साकोरे, संचालक संजय देशमुख, विद्याधर राणे, दत्तात्रय भुसे, ॲड. रूपाली तोरखडे, रेणुका हजारे, सीमा साकोरे, विद्या राणे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. सविता बारवकर यांनी आभार मानले.










