महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणारा पवनाथडी जत्रा उपक्रम कौतुकास्पद – अभिनेते किरण गायकवाड
प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण गायकवाड यांची पवनाथडी जत्रेस भेट


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पवनाथडी जत्रा ही केवळ जत्रा नसून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक उत्सव आहे. महिला बचत गटांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण गायकवाड यांनी केले.


महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे तसेच महिलांचे सबलीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या चार दिवसीय जत्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी प्रसिद्धी मराठी अभिनेते किरण गायकवाड यांनी पवनाथडी जत्रेस भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, मुख्य लिपीक देवेंद्र मोरे, किसन केंगले, लिपीक अभिजीत डोळस तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिनेते किरण गायकवाड म्हणाले, पवनाथडी जत्रा महिलांच्या प्रगतीचे, कर्तृत्वाचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. या जत्रेमुळे महिलांना केवळ आर्थिक मदतच मिळत नाही, तर त्यांच्यात आत्मविश्वासही वाढतो आहे. त्यामुळे महिलांसाठी ही जत्रा म्हणजे केवळ एक व्यापारमंच नसून, नव्या संधींचे दार उघडणारी वाटचाल आहे, असे सांगून त्यांनी सर्व महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उप आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले, पवनाथडी जत्रा म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर महिलांच्या स्वावलंबनाचा आणि सबलीकरणाचा महत्त्वपूर्ण मंच आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या जत्रेत महिला बचत गटांनी तयार केलेली हस्तकला उत्पादने, गृहउद्योगातील पदार्थ, विविध कलाकुसरीच्या वस्तू यांना येथे प्रचंड प्रतिसाद मिळतो. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दरवर्षी आयोजित केला जाणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, स्वावलंबनाच्या दिशेने महिलांचा एक ठोस टप्पा म्हणून पवनाथडी जत्रेची ओळख निर्माण झाली आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यातील कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणे, हा मुख्य उद्देश आहे, असेही अण्णा बोदडे म्हणाले.
यादरम्यान, पंकज सोनी यांच्या एस.एन.डी ऍकेडमीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना तसेच शिवतांडव नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजीत राजे आणि पौर्णिमा भोर यांनी केले.










