फुले नगर झोपडपट्टीत सुविधा द्या – रविंद्र ओव्हाळ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित विभागाचा ठिय्या आंदोलनाचा इशारा


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले नगर झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षी या प्रकल्पाअंतर्गत या ठिकाणच्या १५०० झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. उर्वरित १३०० झोपड्या अद्यापही त्याच ठिकाणी आहेत. या झोपडीधारकांना मागील एक वर्षापासून प्राथमिक सेवा, सुविधा देखील देण्यात आलेल्या नाहीत. याविषयी येथे राहणाऱ्या नागरिकांनी एसआरए कार्यालयात तक्रार केली असता रस्ता, पाणी, वीज, स्वच्छता, मलनिसारण वाहिनी या सुविधा देण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. परंतु महानगरपालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी अध्यापही १५०० पेक्षा जास्त नागरिक राहत आहेत. त्यांना रस्त्यावरून झोपडपट्टीत जाण्यासाठी डांबरी रस्ता उपलब्ध नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही, अनेक ठिकाणी नळ कनेक्शन, मलनिसारण वाहिनी तुटलेल्या आहेत.



अगोदर हटवलेल्या १५०० झोपड्यांच्या जागेमध्ये इमारत उभी राहण्यास किमान तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. तोपर्यंत या १३०० झोपड्यांमधील नागरिकांना येथेच राहावे लागणार आहे. त्यांना प्राथमिक सेवा, सुविधा देणे महानगरपालिकेचे कर्तव्य असून याकडे झोपडपट्टी पुनर्वसन विभाग दुर्लक्ष करत आहे. येथील नागरिकांना ताबडतोब आवश्यक त्या सेवा, सुविधा मनपा प्रशासनाने द्याव्यात, अन्यथा महानगरपालिका भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित विभागाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष रविद्र ओव्हाळ व पदाधिकारी चंद्राम हलगी, रवी काची यांनी दिला आहे.









