मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त व्हावा! – भाजपाचे हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांची मागणी


– राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले निवेदन



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा आणि जीवनचरित्रावर आधारित ‘‘छावा ’’ चित्रपट दि. 14 फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून शिवभक्त आणि सिनेचाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सिनेमागृहात चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.

हिंदूत्त्वासाठी बलिदान देणाऱ्या संभाजी राजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर अधिकाधिक नागरिकांना पहायला मिळावा. त्याद्वारे शिव-शंभू विचारांचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्रभरात ‘‘छावा’’ चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी भाजपा नेते तथा हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न छावा या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी केला आहे. अभिनेते विकी कौशल यांनीही हिंदुभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. त्यामुळे हा चित्रपट शिव-शंभू प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.
संभाजीराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 125 यशस्वी लढाया लढल्या आहेत. या काळात ते एक कुटुंबप्रमुख म्हणून, पती म्हणून, पिता म्हणून, मुलगा म्हणून, राजा म्हणून कसे होते? याचे ‘‘छावा’’ चित्रपटाद्वारे खूप सुंदरपणे सादरीकरण केले आहे. महाराजांचे चरित्र हे खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळेच, महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स मुक्त करावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी या ठिकाणी उभारण्याची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात आणत आहोत. ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’चे काम प्रगतीपथावर आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी महाराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर भव्य-दिव्यपणे मांडला आहे. तो अधिकाधिक नागरिकांना पहायला मिळावा. त्याद्वारे शिव-शंभू विचारांचा जागर व्हावा. यासाठी ‘‘छावा’’ चित्रपट करमुक्त झाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. आमचे हिंदूत्ववादी सरकार यासाठी सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास वाटतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.








