डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी मिशन यामुळे संशोधनासाठी पोषक वातावरण – संगणक तज्ञ अतुल कहाते
आयसीईटीसी २०२५ परिषदेचे पीसीसीओईआरमध्ये यशस्वी आयोजन


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कृषी, वित्त आणि उत्पादन यासारख्या प्रमुख क्षेत्रामध्ये भारत जलद गतीने प्रगती करत आहे. नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करून देशात आरोग्य सेवा देखील प्रगतीपथावर आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे तंत्रज्ञान, डेटा ॲनालिटिक्स, आयओटी आणि फाईव-जी या आधुनिक संकल्पनेचा उपयोग होत आहे. डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी मिशन तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचे प्रस्तावित राष्ट्रीय धोरण यामुळे तांत्रिक संशोधन, विकास आणि प्रयोगांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. सायबर सुरक्षा, डिजिटल पायाभूत सुविधा यामध्ये भारत वेगाने प्रगती करत आहे. अशा क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी परिषद हे एक क्रांतिकारी महत्वपूर्ण पाऊल आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक तज्ञ अतुल कहाते यांनी केले.



पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) मध्ये “आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी परिषद (आयसीईटीसी २०२५) अंतर्गत “फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड कम्प्युटिंग” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, विभाग प्रमुख आणि समन्वयक डॉ. अर्चना चौगुले, डॉ. अर्चना कोलू, डॉ. वैशाली लटके आदी उपस्थित होते.
यावेळी अतुल कहाते यांनी सांगितले की, तंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ताने (एआय) एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. एआयचे जॉर्ज बुल, अलान टुरिंग, फ्रँक रोसनबोल्ट, मॅककॉर्थी, जॉफरी हिंटोन, अल्टमन या शास्त्रज्ञांनी प्रथम संशोधन केले. चॅट जीपीटीला टेक्स्ट नाही तर बायनरी भाषा समजते. तंत्रज्ञान दरवर्षी १० टक्के बदलत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच नियम पाळावा तो म्हणजे शिका, शिका आणि शिका कारण शिकण्याचा अंत नाही असे कहाते यांनी सांगितले.

पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिश तिवारी यांनी सांगितले की, आयसीईटीसी २०२५ ही परिषद शैक्षणिक उपक्रमासह ज्ञान, संकल्पना आणि प्रेरणेचा स्त्रोत आहे. संशोधक, प्राध्यापक, उद्योजक, विद्यार्थी यांना एकत्र घेऊन भविष्यातील तंत्रज्ञानाची दिशा ठरवण्याची ही एक उत्तम संधी आहे. यातून एकमेकाला सहकार्य करीत ज्ञानाची देवाण-घेवाण करून, येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात, नवीन उपक्रमाला चालना देऊन विद्यार्थ्यांनी यामध्ये नवीन संधी शोधून आपले ध्येय गाठायचे आहे असे सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक डॉ. अर्चना कोलु, आभार डॉ. वैशाली लटके यांनी मानले.








