भारताची जागतिक पत उंचाविण्यासाठी सिनर्जी समिटसारख्या उपक्रमांनी चालना मिळेल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक बाजारपेठेत भारताला तिसर्या क्रमांकावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने आयोजित केलेल्या सिनर्जी समिटसारख्या उपक्रमांनी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. 15) केले.



पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि जस्ट फॉर एन्टरप्रेनर (जे फॉर ई) यांच्या वतीने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित सिनर्जी समिटच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सेक्रेटरी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, कुलगुरु प्रा. डॉ. एन. जे. पवार, जे फॉर ई संस्थेचे संस्थापक विशाल मेठी, बिजनेस सेलच्या प्रमुख अमृता देवगावकर, डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. संजीव चतुर्वेदी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ग्लोबल स्कूलचे सल्लागार प्रा. सचिन वेर्णेकर आदी उपस्थित होते. 300 पेक्षा अधिक आंत्रप्रेनर्स आणि गुंतवणूकदारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच, 60 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्टार्टअप आयडियाचे सादरीकरण केले. त्यासाठी काही उद्योजकांनी आवश्यक गुंतवणूक करण्याची तयारीही दर्शविली आहे.

ज्यांनी उत्पादनाचे संशोधन केले आहे आणि ते बाजारपेठेत आणू इच्छितात त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न सिनर्जी समिटच्या माध्यमातून होत आहे, हे कौतुकास्पद आहे, असे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले की, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असणार्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांची स्पर्धा घेण्याची ही कल्पना 30 वर्षांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुढे आली. सांगलीमध्ये डीपेक्स या नावाने सुरू झालेल्या या उपक्रमात सुरुवातीला 20 प्रकल्प सादर झाले. आज यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअपला चालना दिल्यानंतर सृजन हा उपक्रम सुरू झाला. चांगल्या मॉडेलला आर्थिक मदत करण्यात येऊ लागली.
नवनवीन कल्पनांवर संशोधन व्हावे, असे नमूद करून पाटील म्हणाले की, चांगल्या कल्पनांना बाजारपेठ मिळण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक बाजारपेठेत दहाव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आणले आहे. देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा जागतिक बाजारपेठेत भारत तिसर्या स्थानावर असेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या-ज्या देशांनी संशोधनाला चालना दिली त्या देशांनी जागतिक बाजारपेठेवर अधिराज्य केले आहे. यापूर्वी आपला देश कायमच परदेशातून आयात करीत राहिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी संशोधन आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांवर भर दिला आहे. संशोधनातून पुढे आलेल्या उत्पादनांना स्टार्टअप आणि स्टॅन्डअपच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली. हे करत असताना नवीन शैक्षणिक धोरण आणले. आपल्याकडे बुद्धिमत्ता, नावीन्यता आणि कल्पनाशक्तीची कमतरता नाही, त्यामुळे संशोधनाच्या आधारावर देशाने प्रगतीचा नवा मार्ग अवलंबला आहे. देशाच्या सुरक्षा दलाची सर्व यंत्रसामग्री आपण आयात करीत होतो. मात्र, सध्या आपण आपल्या सुरक्षा यंत्रणांची पूर्तता करून 84 कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात केली आहे.
कोरोना काळात सायरस पुनावला यांनी लसीचे संशोधन केले. महिलांच्या कर्करोगावर लसीचे संशोधन त्यांनी केले आहे. त्यांच्या अशाच दहा उत्पादनांची संपूर्ण जगात विक्री होेते. देशाच्या अर्थकारणाला चालना देण्याबरोबरच संपूर्ण देशाची गरज भागविण्याचे सामर्थ्य असणारे या प्रकारचे संशोधन आता आपण करु लागलो आहोत. विशेष म्हणजे या संशोधनाला जगाची मान्यता मिळत आहे. अशाच प्रकारे जगभरातील लोकांची गरज ओळखून नवनवीन संशोधन केल्यास देशाच्या अर्थकारणालाही चालना मिळणार आहे.
ध्येयाने काम करा. यशस्वी उद्योजक म्हणून जगात नाव कमवा. जगातून जेवढे कमवता येईल तेवढे कमवा. मात्र, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजासाठीही योगदान द्या, असे आवाहनही पाटील यांनी केले.
डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या की, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला मार्गदर्शन करत असतात. तसेच, त्यांचे कायमच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या चांगल्या उपक्रमांना पाठबळ असते. जागतिक पातळीवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी या समिटच्या माध्यमातून काही नवीन संकल्पना मिळतील. विद्यार्थी आणि उद्योजक यांनी जीवनामध्ये येणार्या विविध आव्हानांचा सामना करताना स्वतःवर कायम विश्वास ठेवायला हवा. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हीच धाडस केले पाहिजे. तसेच, आव्हानांचा सामना करताना त्यातून येणार्या संधी आपल्याला पकडता आल्या पाहिजेत. प्रत्येक अपयश हा यशाचा पाया असतो. नेपोलियन हिल यांच्या थिंक अॅण्ड ग्रो रिच या पुस्तकातून यश मिळविण्यासाठी काय करायला हवे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. लेखिका जे. के. रोलिंग यांना जीवनात खूप अपयश पचवावे लागले. मात्र, त्यांनी हॅरी पॉटरसारख्या नॉव्हेलची निर्मिती करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. नवीन स्टार्टअप आणि उद्योजकांना सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो. त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि इनोव्हेशनला अनेकदा गुंतवणूकदार मिळत नाही. अशा वेळी त्यांनी निराश न होता प्रत्येक अपयशातून शिकत पुढे जात राहावे. डीपीयू इनक्युबेशन सेंटरने गेल्या वर्षभरात 150 पेटंट घेतले. 126 कॉपीराईट घेतले आहेत. या समिटच्या माध्यमातून मी उद्योजक आणि गुंतवणूकदार यांना सांगू इच्छिते की नवीन इनोव्हेशन घेऊन येणार्या विद्यार्थ्यांना संधी द्यावी.
डीपीयूचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. जे. पवार यांनी विद्यापीठाचे उपक्रम आणि विद्यापीठाने मिळविलेले यश याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला नॅकचे ए ++ मानांकन मिळाले आहे. एनआयआरएफच्या रँकिंगमध्ये विद्यापीठाचा देशपातळीवर 44 वा क्रमांक आहे. विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजचा 11 वा क्रमांक आणि डेंटल कॉलेजचा पाचवा क्रमांक आहे. विद्यापीठाला ग्रीन कॅम्पस पुरस्कारदेखील मिळालेला आहे. डॉ. सचिन वेर्णेकर यांनी आभार मानले.








