चिंचवड मतदारसंघातील विकास कामांसाठी पालिका अंदाजपत्रकात भरीव तरतूद करा – आमदार शंकर जगताप


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात चिंचवड मतदारसंघातील विकास कामांचा समावेश करण्यासह भरीव निधीची तरतूद करण्यासंदर्भात आमदार शंकर जगताप आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची आज (गुरुवारी) महत्त्वपूर्ण बैठक झाली.



या बैठकीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी महापौर माई ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर तुषार हिंगे तसेच विशाल मासुळकर, चेतन घुले आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी मागील काही वर्षांत वित्त आयोगाच्या नियमानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात विकास कामांसाठी अपेक्षित निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. त्यांनी आगामी अर्थसंकल्पात चिंचवड मतदारसंघातील विकासकामांसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी केली.
मुख्य मुद्दे आणि मागण्या
रस्ते आणि पायाभूत सुविधा:
-चिंचवड मतदारसंघात नवीन डीपी रोड विकसित करणे.
-वाढते नागरीकरण लक्षात घेता किवळे, रावेत, मामुर्डी, पुनावळे आणि वाकड परिसरात पायाभूत सुविधा विकसित करणे.
-विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी निधीची तरतूद.
शहर नियोजन आणि नागरी सुविधा:
-वाकड येथे वर्किंग वुमन होस्टेल प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या मदतीने निधी उपलब्ध करणे.
-काळेवाडी भागात रस्त्यांची कामे पूर्ण करणे.
-नव्याने विकसित भागांमध्ये मलनिस्सारण केंद्रे उभारण्यासाठी आवश्यक निधी राखीव ठेवणे.
-पिंपळे गुरव ते दापोडी नवीन पूल विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करणे.
-ताथवडे, रावेत, मामुर्डी आणि किवळे भागातील ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांचे काम पूर्ण करणे.
शिक्षण आणि पाणीपुरवठा:
-रावेत गायरान भागात नवीन शाळेची इमारत उभारण्यास निधीची मागणी.
-मामुर्डी, रावेत आणि किवळे भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन पाणी टाक्या बांधण्यास निधी उपलब्ध करणे.
पर्यावरण आणि गृहनिर्माण:
-उद्याने व खेळाची मैदाने विकसित करावीत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
-पीएमआय योजना अंतर्गत पुनावळे, रावेत आणि किवळे येथे परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प मार्गी लावणे.
-आरएमसी प्लांट्ससाठी पर्यावरण नियमावली बंधनकारक करणे आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे.
महानगरपालिकेतील रस्त्यांचा दर्जा सुधारणा:
– शहरातील रस्त्यांच्या कामांची तपासणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे यांच्या मार्फत करण्याचा निर्णय.
या सर्व मागण्यांसाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी आमदार जगताप यांनी आग्रहाची मागणी केली. आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. येत्या अंदाजपत्रकात या विकासकामांसाठी आवश्यक निधीची तरतूद होण्याची अपेक्षा आहे.








