‘एआय’ प्रणालीद्वारे होर्डिंग्ज परवाना व्यवस्थापन
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह आणि परवाना विभागाकडून दिला जाणारा होर्डिंग्जचा परवाना, देखरेख आणि नियमन यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एआय-चलित प्रणाली महानगरपालिकेने सुरू केली आहे. या उपक्रमामुळे होर्डिंग्ज परवाना व नियमन काम अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रणालीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे.



अत्याधुनिक एआय आधारीत प्रणाली म्हणजे सर्वत्र वापरण्यात येत असलेले काल्पनिक बुध्दीमत्ता असणारे प्रगत तंत्रज्ञान आहे. याद्वारे पिंपरी चिंचवड शहरात उभारलेल्या आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकावर देखरेख आणि नियंत्रण सहज शक्य होणार आहे. या प्रणालीमुळे यापूर्वी या कामासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये आणि खर्चात बचत होणार आहे. ही प्रणाली पर्यावरण पुरक असल्यामुळे पर्यावरणीय संतुलनास देखील मदत होणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अवलंबिलेले हे एआय आधारीत तंत्रज्ञान शहरवासियांच्या निश्चितच उपयोगाचे आणि महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरणार आहे.
…..
चौकट
प्रणाली कसे काम करणार?
या प्रणालीमध्ये अत्याधुनिक लेसर कॅमेरे बसवण्यात आलेल्या विद्युत वाहनाद्वारे शहरातील सर्व होर्डिंग्जचा सर्व्हे करण्यात येणार आहे. यासाठी वेळप्रसंगी ड्रोनचा देखील वापर केला जाणार आहे. सर्व्हेमध्ये शहरातील सर्व होर्डिंग्जचे ३६० अंश कोनातून छायाचित्र घेतले जाईल. ज्यामध्ये होर्डिंग्जची जमिनीपासून उंची, लांबी, रुंदी, धोकादायक स्थिती, होर्डिंग अधिकृत आहे की अनधिकृत अशा माहितीचा समावेश असणार आहे.
……
चौकट
प्रणालीचे फायदे
– या प्रणालीव्दारे होर्डिंग्जबाबत नेमकी व तंतोतंत खरी माहिती मिळणार असल्याने त्यापासून मिळणारे उत्पन्न निश्चित होणार आहे, भविष्यात त्यामध्ये वाढ होणार आहे.
– अधिकृत किंवा अनधिकृत होर्डिंग्ज कोणते, ते स्पष्ट होणार जाहे. त्यासाठी जागेवर जाऊन पाहणी करण्याची आवश्यकता असणार नाही. त्यामुळे वेळ आणि खर्चामध्ये बचत होणार आहे.
– धोकादायक फलकाची माहिती वेळीच मिळणार असल्याने भविष्यात होणारी जीवित तथा वित्त हानी पासून नागरिकांना संरक्षण मिळणार आहे.
– होर्डिंग्ज परवाना पध्दत पुर्णपणे ऑनलाईन होणार असल्याने होर्डिंगधारकांना वेळोवेळी कार्यालयामध्ये यावे लागणार नाही. सदरची माहिती संग्रही राहणार असल्याने नूतनीकरणासाठी प्रतिवर्षी तेचतेच अभिलेख कार्यालयात उपलब्ध करून द्यावे लागणार नाहीत. त्यामुळे होर्डिंगधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
– होर्डिंग्जच्या बाजूस असणाऱ्या वृक्षांचे देखील याद्वारे नियंत्रण होणार असल्याने अनावश्यक तथा विनापरवाना वृक्षतोड थांबेल, व पर्यावरण संवर्धनास बळ मिळणार आहे.
– या प्रणालीव्दारे ३६० अंश कोनातून सर्व होर्डिंग्ज वरती नियंत्रण राहणार असल्याने त्यामध्ये परस्पर बदल कोणालाही करता येणार नाही.
– ही प्रक्रीया ऑनलाईन आणि पेपरलेस असल्याने अधिकारी आणि होर्डिंग्ज धारकांचा वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे.









