शिवसेनेची लोकसभेची तयारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी किवळेत सभा शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून सुरुवात होणार आहे. येत्या शनिवारी (दि.6) सायंकाळी साडेचार वाजता किवळे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा होणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर राबविला. या उपक्रमामुळे राज्यातील जनतेला एकाच छताखाली विविध कागदपत्रे मिळाली. थेरगाव, मावळमध्ये देखील हा उपक्रम झाला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात गेले. लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्यामुळे राज्यातील जनता त्यांच्या कामावर खुश आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे राज्याचा दौरा करत आहेत. शिवसेनेचे खासदार असलेल्या, मागीलवेळी शिवसेनेने निवडणूक लढविलेल्या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे जाणार आहेत. त्यांच्या शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून सुरुवात होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा किवळेतील मुकाई चौकात शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.