भंडारा डोंगराच्या प्रकल्पासाठी शासनाकडे करणार पाठपुरावा आमदार सुनील शेळके यांचे आश्वासन


हभप माऊली कदम (छोटे माऊली) यांची कीर्तन सेवा



देहू,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भंडारा डोंगराच्या नियोजित कॉरिडॉर प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे प्रतिपादनआमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले.

वारकरी संप्रदायाचे व महाराष्ट्राचे वैभव, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पवित्र अशा श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखिल वारकरी संप्रदायाला व महाराष्ट्राला भूषणावह ठरणारे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाच्या कार्यास सर्व वारकरी भाविक, दानशूर दाते जे सहकार्य करीत आहेत त्या सर्वांचेच मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी यानिमित्ताने ऋण व्यक्त केले. श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर उभ्या राहत असलेल्या या भव्य-दिव्य अशा वैभवशाली मंदिरात आपल्या सर्वांचा सहभाग आहे, हे खरोखरच आपले भाग्य आहे. पुढील वर्षी २०२६ ला होणाऱ्या माघ शुद्ध दशमी सोहळ्यापर्यंत या मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाई व जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकोबारायांची प्राणप्रतिष्ठा झालेली असेल असा आपण सर्वांनीच निश्चय करू. तसेच नियोजित कॉरिडॉर व डोंगरावरील रस्ता या सर्व कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपण सर्वजण एकत्रितपणे सातत्याने पाठपुरावा करू व कॉरिडॉरच्या या कामासाठी शासनाकडून सुमारे १००० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज दिली.
श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू व आळंदी यांचा सर्वप्रथम विकास आराखडा होत असताना अजितदादा पवार व तत्कालीन अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील व यांच्याकडे पाठपुरावा करून श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचा देखील या विकास आराखड्यात समावेश करण्यात आला व त्या सर्व क्षेत्रांच्या विकास आराखड्यासाठी त्यावेळी ४०० कोटी रुपये प्रथम मंजूर करण्यात आले. आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या कॉरिडॉर प्रकल्पाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन हे काम मार्गी लावावे असे मत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. जसे कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या-त्या क्षेत्राचा संपूर्ण कायापालट होतो तसाच कायापालट श्रीक्षेत्र देहू, आळंदी व भंडारा डोंगराचा शेळके यांनी करावा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र शेळके यांना डोक्यावर घेऊन नाचल्या शिवाय राहणार नाही असे मत विलास लांडे यांनी व्यक्त केले.
छोटे माऊली यांची कीर्तनसेवा
श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व माघ शुद्ध दशमी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण व किर्तन महोत्सवाच्या’ निमित्ताने आज एकादशीची कीर्तनसेवा वारकरी रत्न, हभप माऊली कदम (छोटे माऊली) यांनी संत तुकोबारायांच्या चरणी रुजू केली.
‘प्रपंच रचना सर्वहि भोगूनि त्यागिली । अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हरविली ।
वैराग्याचि निष्ठा प्रगटुनि दाखविली । अहंता ममता दवडुनी निजशांती वरिली ॥
जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा । तारक तु सकळांचा जिवलग सोयरा ॥
जगद्गुरु संत तुकोबारायांचे स्तवन करणाऱ्या निळोबारायांच्या या स्तवनपर अभंगातून हभप कदम महाराजांनी निरूपण केले.
आजच्या कीर्तनप्रसंगी खेडचे आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघिरे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी नगरसेवक नाना काटे, विश्वनाथ लांडे, विक्रांत लांडे, कात्रज दूध डेअरीचे माजी चेअरमन बाळासाहेब नेवाळे, हभप सुदाम महाराज भोसले, हभप शंकर महाराज मराठे, युवा उद्योजक सुधीर मुंगसे, मा.जि.प. सदस्य प्रशांत ढोरे, माजी सभापती विठ्ठल शिंदे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, उपाध्यक्ष विजय सदाशिव बोत्रे, विश्वस्त गजानन शेलार, मावळ भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे, विश्वस्त रवींद्र महाराज ढोरे संपूर्ण कराळे पाटील परिवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मंदिर निर्माणासाठी एक कोटींची देणगी
या मंदिर निर्माणाच्या पवित्र कार्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, त्यांचे बंधू विश्वनाथ लांडे, भगिनी मुंगसे, गोडसे व गुजर परिवारांकडून 1 कोटी रुपयाची देणगी आमदार सुनील शेळके व आमदार बाबा काळे यांच्या शुभहस्ते ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.








