आजच्या काळात स्वतःच स्वतःशी जोडले जाण्यासाठी काही महत्वाचे असेल तर ते म्हणजे योग – शत्रुघ्न काटे


पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती क्रीडांगण याठिकाणी जागतिक सूर्य नमस्कार दिवस निमित्ताने शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन व योगांजली स्टुडिओ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली.
आजच्या या धावपळीच्या काळात आपली जीवनशैली इतकी बदलली आहे की आपण स्वतःसाठी एक तासही काढू शकत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दिवसभर डेस्कवर बसल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांचा धोका वाढतो. पण योग तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो.

सूर्यनमस्कार ही सूर्याला आदर देण्याची एक प्राचीन योगिक पद्धत आहे. सूर्यनमस्कार १२ योग मिळून बनला आहे .शारीरिक व्यायाम हे केवळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी नाही तर मनही निरोगी ठेवण्यासाठी आणि बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक आहे. “सूर्यनमस्कार” हा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे. यामध्ये सूर्यदेवतेला प्रत्यक्ष नमस्कार व इतर वेगवेगळ्या 10 आसनस्थिती येतात आणि एकाच क्रियेमध्ये सर्वांगाचा व्यायाम होतो. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, सूर्यनमस्कार हे मुलांच्या दिनक्रमाचा एक भाग असायला हवा .सूर्यनमस्कार केल्याने मन शांत व एकाग्र बनते. त्यामुळे सहनशक्ती वाढते व चिंता आणि अस्वस्थपणा कमी होतो,मुख्यतः विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत हे खूप लाभदायक आहे.सूर्यनमस्काराचा नेहमी सराव केल्यास शारीरिक ताकद व जोम वाढतो. भावी खेळाडूंसाठी हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. नियमित सूर्य नमस्कार केल्याचे असंख्य असे फायदे आहेत जसे की शरीर लवचिक होते, चरबी कमी होण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढ, श्वसन संस्थेसाठी उपयुक्त, स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या आजारांपासून बचाव,कंबर व पाठीचा कणा लवचिक होतो,स्नायू बळकट होतात, हृदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते व इतर असे अनेक फायदे होतात.
या कार्यक्रमावेळी पिंपरी चिंचवड भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, पवना सह.बँक संचालक जयनाथ काटे, मनोज ब्राह्मणकर, दीपक गांगुर्डे,जेष्ठ नागरिक संघ सदस्य आदी उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमावेळी योगांजली स्टुडिओच्या अंजली खोकले आणि मीनल साताळकर यांनी मंत्र उच्चारण करीत व अवंतिका पाटील,धनश्री कर्डीले यांनी प्रात्यक्षिक देऊन सूर्य नमस्कार करून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री दाभाडे, रेणुका पासळकर आणि रेखा तोडकर यांनी केले.








