मोशी येथे १०१ बेडच्या धनश्री हॉस्पिटलचे उद्घाटन
आधुनिक तंत्रज्ञानाचा आरोग्य व्यवस्थेला बुस्टर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


आरोग्य सेवा मजबूत करण्यावर सरकारचा भर – अजित पवार



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आधुनिक तंत्रज्ञानातील रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आरोग्य सेवेसाठी उपयुक्त आहे. योग्य निदान होऊन अनेक गंभीर आजारांवर, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करता येतात. रोबोटिक्स तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अचूक वापरामुळे रुग्णाला जीवदान मिळते. महाराष्ट्र शासन जवळपास तेराशे आरोग्यसेवा नागरिकांना देत आहे; तर केंद्र सरकारच्या १८०० आरोग्य सेवा दिल्या जातात. केंद्राप्रमाणेच अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे. या सेवा देण्यामध्ये खाजगी रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. धनश्री हॉस्पिटलने या सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

डॉ. पटवर्धन यांनी मोशी येथे उभारलेल्या अत्याधुनिक १०१ बेडच्या धनश्री हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, पिंपरी चिंचवड शहर भाजपा कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर मंगला कदम, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, धनश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजीव पटवर्धन, डॉ. अपूर्व पटवर्धन, डॉ. सलोनी पटवर्धन, विजय रासकर, स्वाती रासकर, वैष्णवी रासकर, डॉ. अश्विन भालेराव, डॉ. कांचन दुरूगकर-भालेराव आदी उपस्थित होते.
आरोग्यसेवा मजबूत असेल तर देश प्रगती करू शकतो. राज्य सरकार आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी भर देत असून रूग्णांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. सरकारी रुग्णालयांप्रमाणे खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या सरकारी योजना राबविल्या तर या योजनांना अधिक बळ मिळू शकते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
‘ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः’ या श्लोकात सांगितल्याप्रमाणे धनश्री हॉस्पिटल कार्य करीत आहे. माझ्याप्रमाणे पटवर्धन कुटुंब पुढील समाजाला आरोग्य सेवा देण्यासाठी कार्य तत्पर आहे. धनश्री हॉस्पिटलच्या आजपर्यंतच्या प्रवासात अनेकांचे सहकार्य लाभले. यापुढे ही असेच सहकार्य मिळेल असे डॉ. राजीव पटवर्धन मनोगत व्यक्त करताना म्हणाले.
उद्घाटन समारंभास वैद्यकीय, औद्योगिक, व्यवसायिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सलोनी पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजीव पटवर्धन यांनी आभार मानले.
चौकट
शुभेच्छा देताना होते पंचाईत – अजित पवार
रूग्णालयाच्या उद्घाटनाला आलो आहे; पण शुभेच्छा काय देऊ असा प्रश्न पडतो. कारण आपली अधिक भरभराट होवो असे म्हणता येत नाही, असे अजितदादा म्हणताच उपस्थितांनी हसून दाद दिली. धनश्री हॉस्पिटल आणि डॉ. राजीव पटवर्धन यांनी रूग्ण लवकर बरा होईल. उपचारासाठी आलेल्या रूग्णांना चांगली सेवा देऊन धनश्रीचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा अजितपवार यांनी दिल्या.
पटवर्धन कुटुंब रंगलंय आरोग्य सेवेत – देवेंद्र फडणवीस
अजित पवार शुभेच्छेचा धागा पकडून देवेंद्र फडणवीस म्हणाले, आलेला रूग्ण लवकर बरा होऊन घरी गेला पाहिजे. रूग्णालयात पुन्हा येण्याची गरज भासू नये. त्यामुळे धनश्री हॉस्पिटलचा नावलौकिक होईल. येथे एका छताखाली अनेक उपचार सुविधा रुग्णांना मिळतील आणि डॉ. पटवर्धन यांना हॉस्पिटल अधिक मोठे करावे लागेल, अशा शुभेच्छा देऊ असे फडणवीस यांनी दिल्या.








