सक्षम उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी होत आहेत ‘सक्षम’!


उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याला सुरूवात, ३० हजारांहून अधिक विद्यार्थी घेत आहेत लाभ



पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेला सक्षम उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या उपक्रमाचा पहिला टप्पा नुकताच संपला असून त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणित कौशल्यांमध्ये चांगल्याच सुधारणा दिसून आल्या आहेत. महानगरपालिकेचे जवळपास ३० हजार विद्यार्थी या उपक्रमांचा लाभ घेत असून या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयात ‘सक्षम’ करण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सक्षम उपक्रमाचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनीही कौतुक केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि निपुण भारत मिशन अंतर्गत सक्षम हा उपक्रम राबवण्यात येतो. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता ३ री ते इयत्ता ८ वी या वर्गात शिक्षण घेणारे जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होत आहे.
‘सक्षम’ उपक्रमाची दोन टप्प्यांत अंमलबजावणी होत आहे. यामधील पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या टप्प्यात, शाळेतील पहिल्या दोन तासांमध्ये भाषा आणि गणित या विषयांसाठी अनुक्रमे ६०-६० मिनिटे वेळ दिला जात होता. आता या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून यामध्ये दिवसातील ४५ मिनिटे भाषा आणि ४५ मिनिटे गणित विषयासाठी दिले जाणार आहेत. याशिवाय या उपक्रमांतर्गत शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिक्षकांकडून सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण करून त्यानुसार आवश्यक ते मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे अध्यापन प्रक्रियेत सातत्य व गुणवत्ता राखण्यास मदत होत आहे. पालकांनाही या उपक्रमात सहभागी करून त्यांचा सक्रीय सहभाग वाढवण्यावर महानगरपालिकेचा शिक्षण विभाग भर देत आहे.
अशी केली जाते विद्यार्थ्यांची निवड
सक्षम उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड करताना सर्वात प्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक स्तरानुसार विविध गटांमध्ये विभागले जाते. यासाठी क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडियाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे मूलभूत कौशल्य तपासण्यात येते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार गट तयार करून त्यांना अधिक प्रभावीपणे शिकवण्यास सुरुवात करण्यात येते. विशेषतः ‘सक्षम बनू या’ या अभ्यास पुस्तिकांमुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे शिकण्याची संधी मिळत आहे. सक्षम उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सहा अभ्यास पुस्तिका (३ भाषा, ३ गणित) पुरवण्यात येत असून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, यूनिसेफ, विद्या परिषद आणि क्वेस्ट यांच्या सहकार्याने तयार केलेल्या या पुस्तिकांचा प्रभावी उपयोग होत आहे. या पुस्तिकांद्वारे विद्यार्थ्यांना विषय आत्मसात करणे अधिक सुलभ होत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेला सक्षम उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मूलभूत कौशल्य विकसित होत असून, त्यांना पुढील शैक्षणिक टप्प्यांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टिने हा उपक्रम यशस्वी ठरू शकेल.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
सक्षम उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणाला बळकटी मिळत आहे. या उपक्रमाचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने शिकू शकतील. पालक आणि शिक्षकांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
शिक्षणाच्या मूलभूत स्तरावर भर देणारा सक्षम उपक्रम हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यकतेनुसार मार्गदर्शन मिळत असल्याने त्यांच्या प्रगतीत सुधारणा दिसून येत आहे.
– विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका








