ताज्या घडामोडीपिंपरी
कृत्रिम बुद्धिमत्ता विकासात भारत अग्रेसर – सुनील मेहता


पीसीसीओईआर मध्ये ‘रोबोराष्ट्र – २०२५’ या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, देशभरातून १०१ संघाचा सहभाग
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुढच्या काही वर्षात भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स संशोधन, विकास आणि उपयोग यामध्ये अग्रेसर ठरणार आहे. विविध तांत्रिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याकडे भारतीयांचा कल वाढला आहे. भारताच्या विकासासाठी हे उपयुक्त असून जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत अग्रस्थानी असेल, असे मत मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाच्या ग्राहक सेवा विभागाचे व्यवस्थापक सुनील मेहता यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे ‘रोबोराष्ट्र – २०२५’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (३ फेब्रुवारी) मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख राजेंद्र महाजन, पीसीईटी प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, स्पर्धेचे परीक्षक डीआयएटीच्या (डीआरडीओ) प्रा. डॉ. सौम्या एस., मित्सुबिशीचे व्यवस्थापक रोहन गवळी, मॅट्रिक्स रोबोटिक्सचे संचालक मोहन पाटील, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, संगणक विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्चना चौगुले, संयोजक प्रा. डॉ. महेंद्र साळुंके आदी उपस्थित होते.
तंत्रज्ञान विकासामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सचा उपयोग केला तर तांत्रिक उत्कृष्टता वाढते. यापुढील काळात रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुसह्य होण्यासाठी मदत करेल. सामाजिक विकासाला चालना मिळेल, असे राजेंद्र महाजन यांनी सांगितले.
पीसीईटी विश्वस्त मंडळ विद्यार्थ्यांना दर्जेदार आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देते. पीसीसीओईआर मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन केले जाते, असे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले.
ही स्पर्धा यंत्रोत्सव कनिष्ठ आणि वरिष्ठ गट आणि रेस्क्युलंपिक या तीन विभागांत घेण्यात आली. विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि सुमारे दोन लाखांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये देशभरातून विविध शाळा, महाविद्यालयांचे १०१ संघ सहभागी झाले आहेत. असे डॉ. महेंद्र साळुंके यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास विविध विद्याशाखेचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन सिध्दी कौल, मानसी चित्राल यांनी केले. आभार आदित्य परदेशी यांनी मानले.
पुण्यासह मुंबईतील शाळांमधील ३५ संघ सहभागी
या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे पुण्यासह मुंबईतील शाळांचे ३५ संघ सहभागी झाले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स विज्ञान या विषयांबाबत शालेय विद्यार्थी आणि पालकांमध्ये आकर्षण वाढले असून विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने प्रकल्प सादर केले आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल आहे; हे दिसून येते असे मत सुनील मेहता, राजेंद्र महाजन यांनी प्रकल्पांची पाहणी करताना व्यक्त केले.








