कॉंग्रेसने उभा केलेला देश भाजपाने विकायला काढला – डॉ. कैलास कदम


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – देशामध्ये पाचशेहून जास्त कामगार संघटना आहेत. तसेच अनेक शेतकरी संघटना आहेत. यापैकी एकाही संघटनेची मागणी नसताना केंद्रातील भाजपाच्या सरकारने शेतकरी विरोधी आणि कामगारांविरोधी काळे कायदे कोणत्याही विरोधी पक्षांशी अथवा संघटनांशी चर्चा न करता विधेयकाव्दारे पास केले. स्वातंत्र्यापुर्वी आणि स्वातंत्र्यानंतर शेकडो कामगार संघटनांनी लढून काही संविधानात्मक अधिकार मिळविले होते. ते हक्क या मोदी – शहा यांच्या सरकारने एका रात्रीत रद्द केले. कामगारांना व कामगार संघटनांना जाचक ठरतील अशा अटी टाकून चार नविन कामगार कायद्यात त्यांचे रुपांतर केले. हे शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत अन्यथा अधिक तीव्र आंदोलन आगामी काळात केले जाईल असा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला.



कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देशव्यापी निदर्शने करत आंदोलन पुकारण्यात आले होते. या अंतर्गत कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अनिल रोहम, मनोहर गाडेकर, वसंत पवार, सुनिल देसाई, शशिकांत धुमाळ, हमीद इनामदार, गणेश दराडे, कुमार मारणे, किशोर घडीयार, सुभाष मुळे, डॉ. संजय नेवसे, ज्ञानेश्वर चेरीयाल, महेश मंडलिक, अशोक साळवे, राजू खामकर, किरण भुजबळ, संतोष खेडकर, आदींसह या आंदोलनात इंटक, आयटक, सिटू, टी.यु.सी.सी., हिंद कामगार संघटना, ग्रीव्हज कॉटन एंड अलाईड कंपनीच एम्पॉईज युनियन, पूना एम्प्लॉईज युनियन (आयटक), बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑल इंडिया डीफेन्स फेडरेशन, संरक्षण, पोस्ट, कात्रज दूध उत्पादक संघ कामगार संघटना इंटक, बँक कर्मचारी संघ इंटक या संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, एफडीआय या गोंडस नावाखाली भांडवलदारांना सवलती देऊन गरीबांचे शोषण करणारी यंत्रणा पंतप्रधान मोदी – शहा यांचे सरकार उभी करीत आहे. भारतात उत्पादीत होणारे इंधन आणि आयात केलेले इंधन नफेखोरीच्या उद्देशाने एकाच दराने सरकार विकत आहे. भाजपाचे प्रवक्ते देखिल बौध्दिक मवाली लोकं सोशल मिडीयात वाटेल ते खोटं बोलतात.

वृत्तवाहिनींच्या चर्चांमध्ये देखिल धडधडीत खोटं बोलतात. यांचे हे बदमाशीचे खेळ आता नागरिकांच्या लक्षात आले आहेत. नरेंद्र मोदी जे बोलतात ते खोटं बोलतात तेच त्यांचे प्रवक्ते ही खोटं बोलतात. कॉंग्रेसच्या काळात काय झालं असं हे विचारतात. मोदी सरकार आता जे काय विकत आहे हे कॉंग्रेसनेच उभे केलं आहे. आयता मिळालेला देश भाजपाने विकायला काढला आहे. हे सरकार गोरगरीबांचे, शेतकरी – कामगारांचे नसून भांडवलदारांचे आहे अशी टिका डॉ. कैलास कदम यांनी केली.
या देशव्यापी निदर्शने करण्यात आलेल्या आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, गणेश दराडे, मनोहर गाडेकर, अनिल रोहम आदींसह विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांवर टिका केली.








