राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव आयोजित आणि मधुश्री कला आविष्कार, निगडी संयोजित राज्यस्तरीय खुल्या साहित्य अभिवाचन स्पर्धेत साईनाथ बालक मंदिर, चिंचवड या शाळेने सादर केलेल्या ‘बलम सामी’ या अभिवाचन प्रयोगाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.



ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी प्राधिकरण येथे (रविवार, दिनांक ०२) रोजी प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ कवयित्री जयश्री श्रीखंडे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, मधुश्रीच्या अध्यक्ष माधुरी ओक, सचिव राजेंद्र बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. सहाव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या या राज्यस्तरीय खुल्या अभिवाचन स्पर्धेत एकूण १८ संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाला तीस मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. सर्व सहभागी संघांनी स्वरचित संहितांचे अभिवाचन केले हे या स्पर्धेचे एक ठळक वैशिष्ट्य होते. त्यामधून रुद्रंग, निगडी – ‘प्रवास सौदी अरेबियाचा’ (द्वितीय), डी आय सी इंग्लिश मीडियम स्कूल – ‘स्नेहसंमेलन’ (तृतीय); तसेच शब्दरंग कला साहित्य कट्टा – ‘लडाख प्रवासवर्णन’ आणि आमचे आम्हीच – ‘फ… फडतूस’ या दोन संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरूप होते. सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याशिवाय शिल्पा बिबीकर, अश्विनी इनामदार, गौरी टाकळकर, अंजली जोगळेकर, अनघा कुलकर्णी आणि चंद्रशेखर जोशी यांना वैयक्तिक वाचिक अभिनयासाठी मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले. दिग्दर्शक सुनील कुलकर्णी आणि इन्फिनिटी रेडिओ संचालिका माधुरी ढमाले यांनी परीक्षण केले.

रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव या संस्थेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबेळकर यांच्या उपस्थितीत सकाळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. परीक्षकांनी मार्गदर्शन केले. विजेत्या संघांच्या वतीने वैभवी तेंडुलकर यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र बाबर यांनी प्रास्ताविक केले. अशोक अडावदकर यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. संयोजनात राज अहेरराव, विनायक गुहे, नेहा कुलकर्णी, अजित देशपांडे, रेणुका हजारे, मनीषा मुळे, चंद्रकांत शेडगे यांच्यासह मधुश्री कला आविष्कारच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले.








