शालेय शिक्षणानंतर तांत्रिक शिक्षण देणाऱ्या विविध ज्ञानशाखांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी महापालिकेचा ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘स्कूल कनेक्ट’ या उपक्रमाअंतर्गत मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आज भेट दिली. यामध्ये राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर, माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर, माध्यमिक विद्यालय खराळवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.



शालेय शिक्षण झाल्यानंतर तांत्रिक शिक्षण या ज्ञान शाखेचा परिचय महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने स्कूल कनेक्ट या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची भेट आयोजित केली होती.

शालेय शिक्षणानंतर करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत, पारंपरिक ज्ञान शाखेसोबतच तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता भविष्यात तांत्रिक शिक्षण घेतलेल्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता अशा आस्थापनांना मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. ही गरज ओळखून पिंपरी चिंचवड महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी आणि कासारवाडी यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट हा अभिनव उपक्रम राबवला आहे.
स्कूल कनेक्ट या उपक्रमाअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकवल्या जाणाऱ्या विविध ट्रेड्सची माहिती भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. वेल्डर, शीट मेटल वर्कर, प्लंबर, कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, मोटार मेकॅनिक, ड्राफ्ट्समन, पेंटर ,वायरमन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक अशा विविध प्रकारच्या ट्रेड्सना विद्यार्थ्यांनी भेट देत त्याबद्दल माहिती जाणून घेतली. मेकॅनिक विभागात विद्यार्थ्यांना सीएनसी मशीन, स्टिमुलेटर मशीन, वीएमसी मशीन आदी स्वयंचलित आधुनिक यंत्राबद्दल माहिती दिली. लेथ मशीन जॉब फिटिंग, ड्रीलिंग मशीनबद्दल निदेशक निलेश लांडगे, कमलेश बंगाळे यांनी या विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विविध औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या ‘जॉब’ बद्दल विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. गिअर बॉक्ससाठी लागणारे जॉब कसे बनवले जातात याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती करुन घेतली. सध्या तांत्रिक युगात रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असून तांत्रिक शिक्षण विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी गरजेचे आहे. शहरातील उद्योगधंद्यांना कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच शहरातील युवक युवतींना रोजगार मिळावा या उद्देशाने महापालिकेने औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. या माध्यमातून काळानुरूप महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबविलेला स्कूल कनेक्ट हा अभिनव उपक्रम महत्त्वपूर्ण आहे, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले.
मुख्याध्यापिका नलिनी जाधव, शिक्षक गजानन मोकासरे, आरती सरकारे, ज्ञानेश्वर शिंगणे, अर्चना खोडे, वैशाली चव्हाण यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कार्यालय अधिक्षक उमा दरवेश, मुख्य लिपिक विजय भैलूमे यांच्यासह गटनिदेशक प्रकाश घोडके, मनोज ढेरंगे, राजकुमार तिकोणे, शर्मिला काराबळे, निदेशक योगिता कोठावदे, सीमा जाधव, उज्ज्वला सातकर, वृंदावणी बोरसे तसेच कासारवाडी महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य ज्योत सोनवणे, निदेशक वंदना चिंचवडे, सोनाली नीलवर्ण, हेमाली कोंडे, मनसरा कुमावणी, बबिता गावंडे, पूनम गलांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
तांत्रिक शिक्षणाची गरज ओळखून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यगुण विकसित करण्याच्या दृष्टीने तसेच रोजगाराच्या व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. त्यादृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. औद्योगिक आस्थापनांसाठी आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाच्या आवश्यकतेचा विचार करून महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत त्याप्रमाणे नवीन ट्रेड्स सुरू करण्याचा मानस आहे.
-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी चिंचवड महापालिकेने राबविलेला ‘स्कूल कनेक्ट’ हा उपक्रम रोजगार व स्वयंरोजगाराबरोबरच तांत्रिक शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
-प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका








