राज्यातील पहिला तृतीय पंथीय सामुदायिक विवाह सोहळा आज काळेवाडीत, नारी द वुमन संस्थेच्या उपाध्यक्षा अर्चना मेंगडे यांची माहिती


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी राज्यातील पहिला तृतीय पंथीय सामुदायिक विवाह सोहळा पार पार पडत आहे. या विवाह सोहळ्यामुळे पुरोगामी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी एका स्तुत्य सामाजिक उपक्रमाची भर पडत आहे.



पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त म्हणून शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी महत्त्वपूर्ण भर दिला. परंतु त्याही पलीकडे जाऊन हे शहर सामाजिक दृष्ट्या सुसंस्कृत व्हावे तसेच समाजातील अंतिम घटकाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, सामाजिक न्याय मिळावा यासाठी त्यांनी गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्न केले आहेत. यातूनच दिव्यांगांसाठीचे महत्त्वपूर्ण उपक्रम, बचत गटांसाठी अनेक चांगले उपक्रम, कामगार कष्टकरी व सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अतिशय चांगले शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल, शहरातील गोरगरिबांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा या सर्व प्रयत्नांच्या माध्यमातून शेखर सिंह यांनी या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. लाईट हाऊस सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून व कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना तसेच महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी शेखर सिंह यांनी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद म्हटले पाहिजे यासाठी टाटा मोटर्स सिम्बॉयसिस यासारख्या अनेक संस्था स्वतःहून पुढे येऊन त्यांनी शेखर सिंह यांच्या महत्त्वकांक्षी उपक्रमांना मोठा हातभार लावला आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या या प्रयत्नांना आता आकार प्राप्त होऊ लागला असल्याचे दिसून येऊ लागले आहे. तृतीयपथीयांचा सामुदायिक विवाह हा याच प्रयत्नांचा एक दृश्य परिणाम म्हटला गेला पाहिजे. हा सोहळा नारी द वुमन संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख, उपाध्यक्षा अर्चना मेंगडे, भाई विशाल जाधव व पवना समाचारचे संपादक अरुण (नाना) कांबळे यांच्या प्रयत्नातून पार पडत आहे.

मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी नारी द वुमन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथीय पाच जोडप्यांचा सामुदायिक विवाह, सायंकाळी सात वाजता बालाजी लॉन्स काळेवाडी येथे संपन्न होत आहे. या उपक्रमास अनेकांचे मौलिक सहकार्य लाभले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरोबरच चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे, अल्केश त्रिपाठी, माजी नगर सदस्य सुप्रिया चांदगुडे, मल्लीशेठ कदरापूरकर यांच्यासारख्या सामाजिक दृष्टे पण असलेल्या लोकांचा हातभार या उपक्रमासाठी लागला आहे.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता साखरपुडा समारंभ तर दुपारी दोन वाजता हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी सात वाजता पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत या वधू-वरांवर अक्षता पडणार आहेत.
या सोहळ्यास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र राज्याचे एडीजीपी कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आमदार शंकर शेठ जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आदींसहअनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.








