ताज्या घडामोडीपिंपरी

‘सागरमाथा’कडून सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करत नववर्षाचे स्वागत

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२३ या नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या माहुली किल्ल्याजवळच्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करण्यात आली, अशी माहिती मोहिमेचे नेते एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी दिली.
आदल्यादिवशी माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वांद्रे गावाजवळील नंदिकेश्वराचा मंदिरात सर्व गिर्यारोहक समूह पोहोचला. आज सकाळी म्हणजे ३१ डिसेंबर २०२३ रोजी लवकरच गिर्यारोहक चमू सुळक्याच्या पायथ्याशी पोहचला. निसर्ग देवतेचे आणि सुळक्याचे पूजन करून सकाळी ठीक ९.५० वाजता चढाईस सुरवात करण्यात आली. चढाईचे संपूर्ण तांत्रिक नियोजन नेता श्रीहरी तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. सर्वप्रथम शरद पवळे यांनी चढाईस सुरुवात केली. त्यावेळी त्याचा सुरक्षा रोप (बिले) सत्यवान शिरसाट देत होता. अंगावर येणारी ९०° अंशातील खडी चढाई करत शरद आणि सत्यवान यांनी सुमारे ८० फुटांवरील दोन स्टेशनपर्यंत सुरक्षित चढाई केली. यानंतर अनिल पवळे यांनी सरळसोट कातळ भिंतीचा अवघड टप्पा यशस्वीपणे चढाई करत तिसरे स्टेशन गाठले. तेथून पुढे सर्वात आव्हानात्मक ओव्हरहँगची चढाई पुन्हा एकदा शरद यांनी अतिशय कौशल्याने पार करीत चौथे स्टेशन गाठले. आता सुळक्याचा माथा केवळ ३० फूट अंतरावर होता; परंतु तिथे मातीयुक्त खडकातील घसरडा आणि अतिशय निसरडा चढाई मार्ग होता. शरद पवळे आणि सत्यवान शिरसाट यांनी या टप्प्यात सुरक्षित चढाई करत दुपारी १.०० वाजता सुळक्याचा माथा गाठल्यावर  ‘जय भवानी जय शिवाजी’ , ‘हर हर महादेव’ अशा घोषणा दिल्या.
यानंतर अनिल पवळे, हृषीकेश देवकर, प्रकाश ढमाले, राजेश जाधव यांनी सुळक्याच्या माथा गाठला. या सर्वांना सुरक्षितपणे चढाई करत असताना पहिल्या दोन स्टेशनपर्यंत पृथ्वीराज बोऱ्हाडे, अक्षय हत्त्ते यांनी चढाई केली. त्यावेळी पांडुरंग शिंदे यांनी तांत्रिक साहित्य नियोजन आणि बेस कॅम्प नियोजनाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पडली.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने वजीर सुळक्यावर आरोहण मोहिम यशस्वी करताना सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा संस्थेच्या वतीने देण्यात आल्या.
या मोहिमेचे नेतृत्व मोहिमेचे नेते एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी केले; तसेच ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हरपळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी मोहिमेचे अभिनंदन मुंबईस्थित ज्येष्ठ गिर्यारोहक किरण आरफडकर, सचिन गायकवाड आणि माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button