ताज्या घडामोडीपिंपरी

महाविद्यालयीन जीवनात खेळाडू घडतात – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

'एमआयटी एडीटी'त 'विश्वनाथ स्पोर्ट मिट'ला प्रारंभ

Spread the love
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  आपला भारत देश युवकांचा देश आहे. या युवा शक्तीच्या ताकदीवरच उद्याच्या विकसित भारताचे स्पप्न आपण पाहत आहोत. या स्वप्नपूर्तीच्या वाटचालीत क्रीडा क्षेत्राचे व खेळाडूंचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुठलाही खेळाडू हा मानसिक, शारीरिक रित्या फिट आणि सांघिक भावना, खिलाडूवृत्तीने भारलेला असतो. त्यामुळे, समोर येणाऱ्या कुठल्याही संकटाला तोंड देण्यास तो सक्षम असतो. खेळाडूंच्या जीवनात हे सर्व गुण बिंबवण्याचे काम महाविद्यालयीन जीवनात प्रामुख्याने होते. त्यामुळे, या काळात विश्वनाथ स्पोर्ट मिट सारख्या स्पर्धांचे व्यासपीठ मिळाल्याने खेळाडू घडतात, असे मत महाराष्ट्राचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यांनी व्यक्त केले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजीत विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम-२०२५) या राज्यस्थरीय आंतरमहाविद्यालयीन/ आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार प्राप्त नेमबाज अंजली भागवत व अर्जुन पुरस्कार विजेता पॅरा अँथलिट सचिन खिलारे (रौप्य पदक विजेता, पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धा २०२४), एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ. मंगेश तु. कराड, कुलगुरू प्रा.डाॅ. राजेश एस., कार्यकारी संचालक डाॅ.सुनिता कराड, प्र.कुलगुरु डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयर उपस्थित होते.
चौकट
खेळात सातत्य आवश्यक- खिलारे
सचिन खिलारे यावेळी म्हणाले, अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर मी ही स्पर्धापरिक्षेचा नाद सोडून पूर्णवेळ खेळायचे ठरविले. त्या निर्णयामुळेच मी पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत  ६०.३२ मीटर गोळा फेकीसह तब्बल ४० वर्षांनंतर या खेळात पदक मिळवणारा खेळाडू ठरलो. पदकानंतर पंतप्रधानांशीही फोनवरून संभाषण करण्याचे भाग्य मला केवळ या क्रीडाक्षेत्रामुळे लाभले. महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांत आपले नैपुण्य दाखविल्यानंतर खेळाडू कुठेतरी मागे पडतात. त्यामुळे हार न मानता विद्यार्थ्यांनी खेळात सातत्य दाखवायला हवे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
खेळात आत्मपरिक्षण महत्वाचे – भागवत
क्रीडा क्षेत्रात कोणाच्या सांगण्यावरून करिअर करण्याचा निर्णय घेवू नका. स्वतःला वाचायला, आत्मपरिक्षण करायला आणि सर्वांत महत्वाचे खेळ एन्जॉय करायला शिकावे. आवड म्हणून रोज कुठला तरी एक खेळ नक्कीच खेळावा मात्र, करिअर म्हणून त्याची निवड करताना वरील गोष्टींचा विचार नक्कीच करावा. पदक जिंकल्यानंतर देशाचे राष्ट्रगीत चालू असताना पोडियमवर उभे राहणे यासारखी अभूतपूर्व गोष्ट दुसरी कुठलीही नाही. खेळामुळेच, इंग्रजांच्या देशात तब्बल १६ वेळा राष्ट्रगीत वाजवून त्यांना उभे राहायला लावण्याचा आनंद मला मिळाल्याचेही, त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच त्यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठातील जागतिक दर्जाच्या क्रीडा संकुलाचे भरभरून कौतुक केले.
खेळ, आत्मशांतीचे माध्यम- डाॅ.कराड
खेळ ही अशी शक्ती आहे की ज्यातून केवळ शाररिक स्वास्थच नव्हे तर मानसिक आत्मशांती देखील साधता येते. खेळामुळे खेळाडूवृत्ती व आयुष्यात पराभव कसा पचवावा याचे बाळकडू खेळाडूंना मिळते. खेळ हे एकमेव माध्यम आहे की, ज्यामुळे जगात विश्वशांती प्रस्तापित करता येवू शकते, असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड यांनी मांडले. त्यांचे अवघे १५ मिनिटांचे भाषण ऐकताना उपस्थित मान्यवर व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button