जागेचा मोबदला दिल्यानंतरच मेट्रोचे काम सुरू करा
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी परिसरात तीन ते चार वेळ रस्ता रुंदीकरण करण्यात आले. मात्र, बाधित रहिवाशांना कोणताही मोबदला देण्यात आला नाही. त्यात आता महामेट्रोकडून रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. बाधितांना मोबदला दिल्यानंतर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
निगडी परिसरात सन १९०८ ते २००३ या कालावधीत तीन वेळा रस्ता रुंदीकरण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच, राज्य सरकारने या जागा संपादीत केल्या. त्या बदल्यात अल्प मोबदला दिला गेला. त्यामुळे अनेक जण बेघर झाले. तर, अनेकांचे व्यवसाय बंद झाले. आता महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते निगडी या मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग व स्टेशनसाठी निगडी परिसरातील जागा पुन्हा संपादीत केली जाणार आहे. त्यामुळे अनेक रहिवाशांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. बाधितांना महामेट्रो व पिंपरी-चिंचवड महापालिकेने योग्य दराने मोबदला द्यावा. त्यानंतरच जागा संपादन कार्यवाही केली जावी. अन्यथा या कामास विरोध केला जाईल, असा इशारा भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी दिला आहे. त्यांनी महामेट्रो व महापालिकेस तसे निवेदन दिले आहे.