ताज्या घडामोडीपिंपरी
पीएमआरडीएच्या सदनिकांची सोडत प्रशासकीय कारणामुळे पुढे ढकलली


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०- ३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत सदनिकांच्या सोडतीसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. याची सोडत दि. २२ जानेवारी २०२५ रोजी नियोजित होती. मात्र सोडतीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.
पीएमआरडीएच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (1 बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०- ३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिका व एलआयजी (१ BHK) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांची सोडतीसाठी दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहिरात काढण्यात आली होती. एकूण १३३७ शिल्लक सदनिकांच्या लॉटरीसाठी दि. १५ डिसेबर २०२४ पर्यंत ३२७१ लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यापैकी ३२५६ अंतिमतः पात्र झाले असून उर्वरित १५ लाभार्थी अपात्र झाले. पात्र लाभार्थ्यांकरिता सदनिकांची सोडत दि. २२ जानेवारी २०२५ रोजी काढण्यात येणार होती. मात्र, सोडतीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील वेळ व तारीख प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे (भा.प्र.से) यांनी कळविले आहे.








