व्हिजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन


पिंपरी चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ रोजी ५० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन@५० शहर धोरण हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध विषय आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांवर महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मते, सल्ले, उपाययोजना जाणून घेण्यासाठी आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये गटचर्चेचे (फोकस ग्रुप डिस्कशन) आयोजन करण्यात आले होते.



यावेळी उप आयुक्त विठ्ठल जोशी, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अमित पंडीत तसेच विविध विभागांचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, आरोग्याधिकारी, कर्मचारी तसेच शहर परिवर्तन कार्यालयाचे सल्लागार उपस्थित होते.

व्हिजन@५० शहर धोरण उपक्रमाअंतर्गत येत्या ७ वर्षात महापालिका सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुधारणा करण्यासाठी दीर्घकालीन धोरण विकसित करणे, पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगिण विकास करणे, शहरातील प्रत्येक नागरिकाला शहराची ओळख निर्माण करणेकामी विकास धोरणात समाविष्ट करणे, चिरस्थायी पर्यावरणपुरक शहर आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करणे व शहर विकासासाठी आवश्यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करणे आणि महानगरपालिकेचे कामकाज आणखी पारदर्शक होणेकामी शहरातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देणे आदी गोष्टींचा समावेश आहे. ही सर्व उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी शहरी गतिशीलता, पर्यावरण आणि राहणीमान, शिक्षण आणि कल्याण, तंत्रज्ञान आणि प्रशासन, शहरी पायाभूत सुविधा, आर्थिक विकास या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सर्व विषयांना केंद्रस्थानी ठेऊन गटचर्चेमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रश्नावली देण्यात आली होती. या प्रश्नावलीच्या आधारे उपस्थितांनी आपली मते किंवा भविष्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना मांडल्या.
पिंपरी चिंचवड शहराला केवळ औद्योगिक नगरी म्हणून नाही तर आता स्मार्ट सिटी म्हणूनही ओळखले जाते. प्रगतीच्या दिशेने ही वाटचाल सुरू असताना २०३२ साली महापालिकेस ५० वर्षे पुर्ण होत आहेत. तत्पुर्वी २०३२ पर्यंत व्हिजन@५० या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेने काही ध्येय ठरविली आहेत. ही ध्येय पुर्ण करण्यासाठी व्हिजन@५० शहर धोरण उपक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे. त्यासाठी विविध गटचर्चांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत शहरातील भागधारकांना देखील सहभागी करून घेण्यात येत आहे. नागरिकांच्या गरजा समजून घेऊन शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरणार असून शहराचा सर्वांगीण विकास होण्यास यामुळे मदत मिळणार आहे.
विठ्ठल जोशी, उप आयुक्त, प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
व्हिजन@५० शहरी धोरण उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या गटचर्चांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. याद्वारे शहरी विकासासाठी आवश्यक उपाययोजनांची नवी दारे उघडण्यास आणि आरोग्य, वैद्यकीय, पर्यावरण, शहरी गतिशीलता, शिक्षण, तंत्रज्ञान या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रिय करून सर्वांगीण विकास साधण्यास मदत मिळणार आहे. तसेच या उपक्रमात भागधारकांचा सहभाग वाढविल्याने महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक होण्यास देखील मदत मिळणार आहे.
– सचिन पवार, उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पुढील ६ आठवडे भागधारकांसमवेत होणार गटचर्चा..
सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध भागधारकांना देखील व्हिजन@५० शहर धोरण या उपक्रमात सामिल करून घेण्यात येणार आहे. यासाठी पुढील ६ आठवडे चालणाऱ्या या गटचर्चेमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार असून अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी मांडलेल्या प्रतिक्रिया, सल्ले, उपाय यावरही चर्चा करण्यात येणार आहे.








