ताज्या घडामोडीपिंपरी
कोकणाचा सिंचन आणि उद्योगाचा अनुशेष भरून काढणार – मंत्री योगेश कदम


कोकणवासिय मित्र परिवारांच्या सत्कार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि कोकणाचा विकास झाला नाही हे वास्तव आहे. कोकणाचा विकासाचा आणि सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन गृह आणि महसूल ग्रामीण विकास पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधील कोकण वासिय मित्र परिवारांच्या वतीने पिंपरी येथे आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे माजी सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सद्गुरु कदम, शशिकांत चव्हाण, आण्णा कदम, राजेश दळवी, अवधूत कदम, गजानन मोरे, माजी नगरसेवक ममता गायकवाड, निर्मला कदम, सुजाता पालांडे, प्रमोद ताम्हणकर, विनायक गायकवाड, राजेंद्र सोंडकर, कॅप्टन श्रीपत कदम, अशोक कदम, राजेश फणसे, महेंद्र भोसले, आनंद भाटे, सुनील पवार, मिलिंद वराडकर, राजेंद्र सोंडकर, एकनाथ कदम, विजय निकम, विशाल नाचरे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
मंत्री योगेश कदम म्हणाले, ‘मूळ कोकणवासी असणाऱ्या आणि पिंपरी चिंचवड, पुणे शहरात राहणाऱ्या नागरिकांनी माझा सन्मान केला आहे. त्यामुळे मी भारावलो आहे. आपल्या आशीर्वादाने मी मंडणगड दापोली मतदारसंघातून मोठ्या मतांनी निवडून आलो. आता मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पंचवार्षिकमध्ये साडेतीन हजार कोटींची कामे मंजूर केली आहेत ते पाच हजार कोटीपर्यंत विकासकामे करण्याचा मानस आहे. मंत्रिपद मिळाल्याच्या पहिल्या दिवशी मतदारसंघांमध्ये साध्या कागदावर मी मुख्यमंत्र्यांना कोकणातील प्रस्तावित व प्रलंबित धरणांची कामे करणे बाबत पत्र दिले. कोकणामध्ये विविध रोजगार आणण्यासाठी, उद्योग आणण्यासाठी तसेच प्रलंबित धरणे पूर्ण करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रोजगार आणि सिंचनाचा कोकणाचा अनुशेष भरून काढायचा आहे.’
मंत्री योगेश कदम यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सद्गुरु कदम, राजेश दळवी, अवधूत कदम आणि गजानन मोरे यांच्या हस्ते शिंदेशाही पगडी, शाल, श्रीफळ आणि भक्ती शक्ती शिल्प प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष सद्गुरु कदम प्रास्ताविक करताना म्हणाले की, कोकणात येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळालीच पाहिजे. तसेच दापोली मंडनगड एमआयडीसी मध्ये येणाऱ्या सर्व उद्योग व्यवसायांमध्ये या परिसरातून पिंपरी चिंचवड, पुणे येथे विस्थापित झालेल्या नागरिकांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी पस्तीस टक्के जागा राखून ठेवाव्यात. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड मधील कोकणवासीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिन्यातून किमान एक दिवस तरी राखीव ठेवावा असे आवाहन मंत्री योगेश कदम यांना केले.
कार्यक्रमाच्या संयोजनात अभिषेक शिंदे, ज्ञानदेव पवार, प्रदीप खांबे, पारधुले कॅप्टन संजय कदम, पांडुरंग कदम, दत्ता महाडिक, कृष्णा यादव, अविनाश घाणेकर, शांताराम गुडेकर, अनिल नरवणकर, शिवाजी साळवी, मंगेश गोरे, बाबाराम शिंदे, भालचंद्र दुर्गावाले, अमोल शिंदे, मनोहर वारीक, प्रवीण घाटविलकर, निखिल कदम, मोनाली महिंद्र यादव, गौरी संजय मोरे, योगिनी मुकेश होळकर, मोहिनी राजकुमार सोविलकर, मानसी मनोहर वारीक, सुप्रिया निलेश चव्हाण, पल्लवी सागर शिंदे, शितल लक्ष्मण जाधव आदींनी सहभाग घेतला होता.








