ताज्या घडामोडीपिंपरीपुणेशिक्षण

पोलिस हे आपले शत्रु नव्हे मित्र – डाॅ.राजकुमार शिंदे

Spread the love
उपायुक्तांनी साधला ‘एमआयटी एडीटी’तील विद्यार्थ्यांशी संवाद

लोणी काळभोर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –
 विद्यार्थी व युवा हे आपल्या विकसित राष्ट्राच्या वाटचालीतील मुख्य भागिदार आहेत. इंजिनिअर, संशोधक म्हणून त्यांच्या खांद्यावर भविष्यात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहावे, भरपूर अभ्यास करावा आणि आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून कुठलीही समस्या आल्यास थेट कायदा हातात न घेता, प्रथम ११२ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा. कारण, पोलिस हे आपले शत्रु नव्हे मित्र आहेत, असे प्रतिपादन पुणे शहर झोन-५ चे पोलिस उपायुक्त डाॅ.राजकुमार शिंदे यांनी केले.

ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी, पुणे शहर हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी-काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.सुजित धर्मपात्रे, डाॅ.सुदर्शन सानप, डाॅ.सुराज भोयार आदी मान्यवर उपस्थित होते.
डाॅ.शिंदे बोलताना पुढे म्हणाले, एमआयटी ही महाराष्ट्रासह देशात अत्यंत नावाजलेली संस्था आहे. या संस्थेने आजवर देशाला अनेक संशोधक, इंजिनिअर, नेव्ही अधिकारी दिलेले आहेत. या शैक्षणिक संकुलात शिकलेले विद्यार्थी जगभरात देशाचे नाव उज्वल करत असताना, आपल्या कुठल्या कृतीने संस्थेच्या प्रतिमेला धक्का पोचणार नाही, ही जबाबदारी सर्वप्रथम विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील सुसज्ज क्रीडा संकुलाचा वापर करून विविध खेळ खेळावेत व त्यातून स्वतःला शारीरिकरित्या सदृढ ठेवावे. त्यांनी क्षणिक सुखासाठी व्यसनांना जवळ न करता, आपला कॅम्पस ड्रग, रॅगिंग फ्री ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी, लेडी सिंगम म्हणून प्रचलित असणाऱ्या अनुराधा उदमले म्हणाल्या, महाविद्यालयीन काळ हा कुठल्याही विद्यार्थ्याच्या जीवनात अत्यंत मोलाचा असतो. या काळात, विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करून आपल्या पालकांची स्वप्ने पूर्ण करावीत. त्यांनी क्षणिक आनंदाच्या नादात काही अक्षम्य चुका होणार नाहीत व ज्यामुळे करिअर उद्वस्त होणार नाही याचे भान ठेवावे, असे आवाहन केले.
चौकट
…अन्यथा तिसऱ्या गुरूला पाचारण करावे लागते
विद्यार्थ्यांच्या जिवनातील विविध पातळ्यांवर प्राप्त होणाऱ्या गुरूंची भूमिका अत्यंत मोलाची असते. आई-वडील हे आद्य गुरू तर शाळा व महाविद्यालयातील शिक्षक हे त्यांचे दुसरे गुरू असतात. परंतु, एखाद्याचे वर्तन खराब असेल व ते पहिल्या दोन गुरूंच्या नियंत्रणाबाहेर असल्यास, तिसरे गुरू अर्थात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो. त्यामुळे, या गुरूच्या सानिध्यात आले की, कुठलाही शिष्य नक्कीच सुधारतो, अशी कोटी डाॅ.शिंदे यांनी करताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.कोट
लोणी-काळभोर परिसरात वाढलेल्या युवकांच्या हाणामारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आम्ही तातडीने ठोस पावले उचलली आहेत. येथील गावकऱ्यांना तथा युवकांना कुठलीही समस्या असल्यास त्यांनी कायदा हातात न घेता तातडीने आमच्याशी संपर्क साधावा. भविष्यात कायदा मोडणाऱ्यांची कुठल्याही परिस्थितीत हयगय केली जाणार नाही.
– राजेंद्र करणकोट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी-काळभोर, पोलिस ठाणे.

कोट
एमआयटी एडीटी विद्यापीठ हे विश्वशांतीचा संदेश देणारे विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे कर्मचारी व विद्यार्थी शिस्तप्रिय असून त्याचमुळे कॅम्पसमध्ये आजवर एकही अनुचित प्रकार घडलेला नाही. विद्यापीठाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपसातील मतभेदांवरून काही घटना घडल्यानंतर त्याची प्रशासनाने नोंद घेतली आहे. त्यानुसार वेळोवेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाते. भविष्यातही आम्ही विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत सजग राहू.
– डाॅ.महेश चोपडे, कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button