पिंपरी चिंचवड महापालिका आपत्ती व अग्निशमन विभागातील अधिकारी कर्मचारी आणि जवानांना अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पूर, भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात उद्भवणाऱ्या समस्यांचे सुयोग्य नियोजन तसेच समुदाय, सांस्कृतिक वारसा, सामाजिक व आर्थिक मालमत्ता यांचे संरक्षण करण्याबाबतचे प्रशिक्षण प्रात्याक्षिकांद्वारे आणि संगणकीय सादरीकरणाद्वारे पिंपरी चिंचवड महापालिका आपत्ती व अग्निशमन विभागातील अधिकारी कर्मचारी आणि जवानांना देण्यात आले.



पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी जपानमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी कार्यरत असलेल्या स्थानिक प्राधिकरण परिषदेच्या सिंगापूर येथील प्रतिनिधी कार्यालयाच्या सहकार्याने चिंचवड येथील विज्ञान केंद्र येथे अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या विविध सत्रात आपत्ती व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी औंध कॅम्पच्या ३३० इन्फट्री ब्रिगेडचे कर्नल नितीन रुमाले, पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, उपआयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदीप खोत, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, बापूसाहेब गायकवाड, विजय भोजने, संध्या वाघ, प्रेरणा सिनकर, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्यासह आपत्ती आणि अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
जपान येथील “जे.क्लेर” संस्थेचे विशेषज्ञ शिआमि यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जपान मधील प्रशस्त रस्ते, नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास बचावकार्यासाठी तयार करण्यात आलेले आपत्कालीन मार्ग, पूरपरिस्थितीत सतर्कतेचा इशारा देणारी स्वयंचलित आधुनिक यंत्रणा, अत्याधुनिक पाणीपुरवठा यंत्रणा तसेच कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि बचावकार्यासाठी वापरण्यात येणारी साधने याबाबतची सविस्तर माहिती देऊन पिंपरी चिंचवड शहरातील आपत्ती प्रवण क्षेत्रांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळताना करावयाच्या उपाययोजना आणि यंत्रांचा कृतीशील वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिआमि म्हणाले, आपत्कालीन किंवा पूरपरिस्थितीत रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी रस्ते आणि पूल टिकाऊ तसेच सुरक्षिततेला केंद्रस्थानी ठेऊन विकसित करणे गरजेचे आहे. हे रस्ते किंवा पुल अवजड वाहनांचा भार पेलण्यास सक्षम असायला हवेत. रस्त्यांना भुकंप किंवा अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे तडे गेल्यास आवश्यक उपाययोजना करून रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्याचा आराखडा तयार करायला हवा. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, पोलिस, अग्निशमन दल यांना जलद हालचालीसाठी स्वतंत्र मार्ग उभारलेले असल्यास तात्काळ मदतकार्य करण्यास देखील मदत मिळते. तसेच प्रत्येक मुख्य रस्त्याच्या जवळ आपत्कालीन परिस्थिती जलद पद्धतीने हाताळता यावी यासाठी आपत्ती निवारण केंद्रे देखील उभारणे गरजेचे आहे. आपत्तीच्या काळात शहरातील रस्ते आणि इमारतींच्या टिकाऊपणामध्ये सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संरचनात्मक धोरण आखणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत विविध उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये जनजागृती वाढविणे, आपत्तींच्या काळात पूर्वसूचनेच्या अत्याधुनिक प्रणाली विकसित करून पर्यावरणीय तंत्रज्ञानाचा वापर करणे देखील आवश्यक असल्याचे शिआमि यांनी यावेळी सांगितले.








