ताज्या घडामोडीपिंपरीपुणे
‘आयसीएआय’च्या केंद्रीय समिती सदस्यपदी सीए चंद्रशेखर चितळे यांची तिसऱ्यांदा निवड


विभागीय समिती सदस्यपदी सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे व सीए राजेश अग्रवाल
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दी इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समिती सदस्यपदी (सेंट्रल कौन्सिल मेम्बर – सीसीएम) पुण्यातील सीए चंद्रशेखर चितळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. विभागीय समिती सदस्य (रिजनल कौन्सिल मेंबर-आरसीएम) म्हणून सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे व सीए राजेश अग्रवाल यांची प्रथमच निवड झाली आहे. यंदा पुणे शाखेतून एक सीसीएम आणि तीन आरसीएम निवडून आले आहेत. २६ व्या सेंट्रल कौन्सिलसाठी व २५ व्या रिजनल कौन्सिलसाठीची निवडणूक नुकतीच झाली. ही निवड २०२५-२०२९ या कालावधीसाठी असणार आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुणे आयसीएआयच्या वतीने पुणे आयसीएआयचे चेअरमन सीए अमृता कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील शाखांचा समावेश आहे.
सलग तिसऱ्यांदा ‘आयसीएआय’च्या केंद्रीय परिषदेत निवड होणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. ही निवड व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी, उत्कृष्टतेचा ध्यास आणि संस्थेच्या विकासासाठी केलेल्या कामांची पावती आहे. ‘आयसीएआय’च्या माध्यमातून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला भक्कम पाया देण्यासाठी व बदलत्या तंत्रज्ञानासह व्यावसायिकांना घडवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात आपण दिलेल्या विश्वासामुळे आणखी मोठी जबाबदारी आली आहे, असे वाटते. आपल्या पाठिंब्याने प्रेरित होऊन, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अधिकाधिक योगदान देण्याचा माझा संकल्प आहे, असे चितळे यांनी नमूद केले. सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे व सीए राजेश अग्रवाल यांनीही आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत सीएंसाठी भरीव काम करणार असल्याचे सांगितले.








