उद्योजकांनी परिवर्तनशील असावे – डॉ. आनंद देशपांडे


‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ समारोप



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) उद्योग जगतामध्ये यश मिळवण्यासाठी उद्योजकांनी परिवर्तनशील असावे, श्रमाला अर्थपूर्ण संधीमध्ये परावर्तित करून, सर्वोत्तम गुणवत्तेची कास धरून यशस्वी होता येते. खुल्या आर्थिक धोरणात या गिग इकॉनॉमीच्या काळात व्यवसायातील पारंपरिक पद्धती बाजूला ठेवून, विशेष कौशल्य प्राप्त असणाऱ्या अनेक व्यक्तींना एकत्रित करून, नाविन्यपूर्ण कल्पना राबवून आपल्या उत्पादनाचे, सेवेचे वेगळेपण खुल्या बाजारपेठेत सादर करून ग्राहकांना कमी खर्चात सेवा देता आली पाहिजे तोच व्यवसाय व उद्योजक यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन पर्सिस्टंट कंपनीचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने, बालेवाडी येथे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ मध्ये समारोपाच्या कार्यक्रमात डॉ. आनंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये नावीन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विजेत्या स्टार्टअप कंपन्यांना गौरविण्यात आले. यामध्ये विभाग एक : – मिनिमम वायबल प्रॉडक्ट मध्ये प्रथम – एसएनपी इनोवेशन प्रायव्हेट लिमिटेड, द्वितीय – आबराकाडाबरा सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि तृतीय बायोपॅन सायंटिफिक प्रा. लि.; विभाग दोन अर्ली ट्रॅक्शनमध्ये प्रथम – टीजीपी बायोप्लास्टिक प्रा. लि., द्वितीय – हब बायोमास प्रा. लि. आणि तृतीय – बिजअमिका सॉफ्टवेअर प्रा. लि.; विभाग तीन रेव्हेन्यू स्टेज मध्ये प्रथम – कायरस एनर्जीस प्रा. लि., द्वितीय – इव्हेंटबीप आणि तृतीय – सेरेब्रोसपार्क इनोव्हेशन प्रा. लि. यांचा समावेश होता.
यासाठी परीक्षक म्हणून डॉ. आनंद गोविंदलुरी, कपेल मल्होत्रा, डॉ. सचिन पैठणकर, मिलिंद बाबर, मिलिंद गरूड, राजेश पोखरकर, सनिद पाटील, विनीत लदानिया, सुशील गुजराथी, आणि विजय तळेले यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमात स्टार्टअप्स आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधला, ज्यामुळे महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी जागतिक गुंतवणुकीचे मार्ग तयार झाले. नवोन्मेष आणि आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी स्टार्टअप्सची महत्त्वपूर्ण भूमिकाही अधोरेखित झाली. या मध्ये एकूण १६ स्टार्टअप्सचे प्रदर्शन करण्यात आले, तर ३० हून अधिक देशांतील १०० हून अधिक उद्योजकांनी उद्योजकता, नवकल्पना आणि जागतिक भागीदारी यावर विचार मांडले.
यावेळी डॉ. आनंद देशपांडे यांनी सांगितले की, प्रत्येक व्यवसायाची स्वतःची एक पद्धत असते ती पद्धत बदलणे काही सोपे नसते. त्यासाठी नाविन्यतेचा विचार करायला हवा. तुमचे भांडवल कमी असेल तर तुम्ही अमेरिकेसारख्या देशातील मोठ्या क्षेत्रात स्थान निर्माण करू शकणार नाही. त्यासाठी मोठी तयारी करायला हवी तरच तुम्ही मोठी झेप घेऊ शकता. उत्पादना बरोबरच विपणन व्यवस्था व विक्री पश्चात सेवा देखील प्रत्येक व्यवसायात आवश्यक आहे. लहान मोठ्या स्टार्टअपने स्वतःचे ग्राहक स्वतः शोधले पाहिजे. ग्राहकांच्या नजरेतून आपले उत्पादन आकर्षक बनवा. ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास करून ते करा. तुमचा वैयक्तिक व्यवसाय असेल तर तुमच्या क्षमता पण मर्यादित राहतात. जर तुम्ही एकत्रितपणे काम केले तर तुमच्या क्षमता वाढतात, व्यवसाय वाढतो आणि हेच व्यवसायासाठी फायद्याचे असते. कोणतेही सरकार सगळ्यांसाठी रोजगार निर्मिती तयार करू शकत नाही ते तुम्हालाच करावे लागतील. एकट्या महाराष्ट्राने वन ट्रिलियन रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. जग वेगाने बदलत आहे, तुम्ही पण बदला. संधी तुमच्या आजूबाजूला आहेत त्या शोधा आणि प्राप्त करा. प्रत्येक व्यवसायिकाला विपणन कौशल्य प्राप्त करता आले पाहिजे. जो विक्री व विक्री पश्चात सेवा देऊ शकतो तो कधीच अपयशी ठरणार नाही, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.








