ताज्या घडामोडीपिंपरी

‘पर्पल सॉल्व्हथॉन २०२५’ स्पर्धेत ५० संघ होणार सहभागी

Spread the love

 

‘पर्पल जल्लोष’ महोत्सव १७ ते १९ जानेवारी दरम्यान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )-  दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने तीन दिवसांचा ‘पर्पल जल्‍लोष’ हा दिव्यांग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १७ ते १९ जानेवारी दरम्यान हा महोत्सव चिंचवड येथील ‘ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर’ येथे होणार आहे. या महोत्सवांतर्गत ‘पर्पल सॉल्व्हथॉन २०२५’ ही अनोखी स्पर्धा होणार असून त्यासाठी देशभरातून तब्बल ५० संघ सहभागी होणार आहेत. याचा उत्साह आता शिगेला पोचला आहे.

‘पर्पल सॉल्व्हथॉन’च्या माध्यमातून जागतिक स्तरावरील विविध उपाय शोधणाऱ्या दिव्यांग बांधवांना, तरुण नवोदितांना एकत्र आणणे, हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. हा उपक्रम ‘पर्पल जल्लोष’च्या व्यापक मोहिमेचा भाग आहे. “इनोव्हेट फॉर इनक्लूजन – एम्पॉवरिंग ऍक्सेसिबिलिटी थ्रू यंग माइंड्स” या थीमसह ‘पर्पल सॉल्व्हथॉन २०२५’ मध्ये आर्किटेक्चर, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. यामध्ये अडथळ्यापासून मुक्त सार्वजनिक जागा, सहाय्यक उपकरणे आणि समावेशकता यासारख्या आव्हानांसाठी प्रभावी उपाय विकसित करण्यासाठी एकमेकांना मदत केली जाईल.

हा उपक्रम महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनने, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे आणि द गुड टॉक फॅक्टरी यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे.

……

चौकट

तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन

तीन दिवसांच्या या उपक्रमात
सहभागी झालेल्यांचे पहिल्या दिवशी विचारमंथन सत्र असेल. विविध विषयांवर यामध्ये मार्गदर्शन केले जाईल. दुसऱ्या दिवशी मूळ संकल्पनेचा झालेला विकास यावर चर्चा होईल. तर तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाची समाप्ती होईल. यावेळी सर्व नवसंकल्पनांचे अनावरण केले जाईल. ‘पर्पल सॉल्व्हथॉन’ स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना मार्गदर्शन आणि मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली एक प्रतिष्ठित ज्युरी पॅनल (परीक्षक) असेल. नवीन कृती, नाविन्य मार्ग काढण्यासाठी हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

…………
चौकट :

असे आहे कार्यक्रम वेळापत्रक

दिनांक : १७ ते १९ जानेवारी २०२५

स्थळ: ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड, पुणे

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५

प्रवेश: विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला

या तज्ज्ञांना ऐकण्याची संधी

“पर्पल सॉल्व्हथॉन २०२५” मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुढील तज्ज्ञांचा समावेश आहे.

– अमोल जोशी, व्यवस्थापकीय संचालक, अ‍ॅक्सेंचर

– प्रा. कविता मुरुगकर, प्राचार्य, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे

– श्रेयस डिंगणकर, सहाय्यक प्राध्यापक, भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट

– सायली अंधारे, सहाय्यक प्राध्यापक आणि युनिव्हर्सल डिझाइन सेल प्रमुख, डॉ. बी. एन. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे

– डॉ. एम. के. कौशिक, सीईओ आणि संचालक, विष्णू फाउंडेशन टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर

– डॉ. राम गंभीर, माजी प्रमुख, मानववंशशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

– अलंकार अचाडियन, सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक, युनोइया इनोव्हेशन्स

“पर्पल सॉल्व्हथॉन २०२५” उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद हा दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक संधी निर्माण करण्यासाठी जागरूकता आणि बांधिलकीचे निदर्शक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणाई नवीन बदलासाठी, नवनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अडचणींवर उपाय शोधून काढतील. दिव्यांग व्यक्तींच्या जीवनामध्ये विधायक बदल घडविण्यास या अनोख्या उपक्रमाचा नक्कीच उपयोग होईल.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
—–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button