“महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा निर्माण केला!” – डॉ. श्रीपाल सबनीस


नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने महेंद्र भारती सन्मानित



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “बाबा भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभिजात पाली भाषेचे जतन, संवर्धन आणि संशोधन करीत असताना महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा निर्माण केला!” असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संकल्प गार्डन कार्यालय, आळंदी रोड, वडमुखवाडी, चऱ्होली येथे शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी काढले.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, एस. के. एफ. एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सुनील आव्हाळे, माजी सभापती सुभाष उमाप, श्रमश्री बाजीराव सातपुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

सन्मानचिन्ह, श्रीतुकाराममहाराज यांची गाथा, शाल, पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून महेंद्र भारती आपल्या वडिलांचे सामाजिक आणि पाली भाषा संवर्धनाचे कार्य अतिशय तळमळीने पुढे नेत आहेत. बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण वर्षभर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिसरण घडेल, असा विश्वास वाटतो!”
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, “पन्नास वर्षांहून अधिक काळापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राहुल सांस्कृत्यायन अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांपासून प्रेरणा घेऊन बाबा भारती यांनी विविध ग्रंथांचे लेखन केले. त्या गोष्टींचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न बाबा भारती करीत आहेत!” असे विचार मांडले. सुदाम भोरे यांनी आपल्या मनोगतातून, “समाजातील सर्वधर्मीय व्यासंगी अन् विचारवंतांच्या कार्याची दखल घेऊन निरपेक्षपणे त्यांचा सन्मान करण्याची महेंद्र भारती यांची वृत्ती खूप भावली. त्यामुळेच नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या माध्यमातून त्यांचा विशेष सन्मान करण्याचा एकमताने निर्णय घेतला!” अशी भूमिका मांडली.
सत्काराला उत्तर देताना महेंद्र भारती यांनी, “माझे वडील बाबा भारती हे समाजात लोकशिक्षक म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी संपादित केलेल्या पाली – मराठी शब्दकोशाची नूतन आवृत्ती महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात यश मिळाले. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून पाली भाषेचे विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधक यांना शैक्षणिक साहाय्य मिळावे यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्नशील आहोत. आजचा सन्मान ही वडिलांच्या कार्याची पुण्याई आहे!” अशी कृतज्ञतापर भावना व्यक्त केली.
पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. मनाली सातपुते यांनी आभार मानले.








