पिंपरी-चिंचवडमध्ये अटल महाआरोग्य शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून पाहणी - अधिकाधिक रुग्णांना लाभ नियोजन पूर्व बैठकीत संकल्प
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावेत. या करिता आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ‘अटल महाआरोग्य’ शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या शिबिराचा लाभ शहरासह पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना व्हावा. यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त नवी सांगवी येथील पी.डब्लू.डी. मैदानावर भव्य “अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर” दि.५, ६ आणि ७ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून या शिबीरासाठी लाखोंच्या संख्येने लाभार्थी येणार असल्याने या शिबिराची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या कामाची भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पाहणी केली. तसेच, अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीराची आढावा बैठक घेवून नियोजनाबाबत माहिती घेतली.
यावेळी माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अमित गोरखे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस विलास मडिगेरी, नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, उपाध्यक्ष माऊली थोरात, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, संतोष कांबळे, माजी नगरसेविका सविता खुळे, उषा मुंढे, शारदा सोनवणे, जयश्री गावडे, उपाध्यक्ष बिभीषण चौधरी यांच्यासह मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व विविध समितींचे सदस्य उपस्थित होते.
शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मैदान सपाटीकरण, स्टॉल उभारणीची मैदान समिती सदस्यांकडून सविस्तर माहिती घेतली. अटल महाआरोग्य शिबिराच्या दिवशी प्रत्येक रुग्णाला तपासणीच्या सुविधा सुलभपणे मिळतील, असे नियोजन करावे. या शिबिराच्या लाभापासून कोणताही रुग्ण वंचित राहता काम नये. या शिबिरात विविध आजाराच्या रुग्णांची तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक असेल तर शस्त्रक्रिया करण्यात येतील. या शिबिराचा जिल्हयातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेता यावा, यासाठी विविध कमिटी तयार केल्या आहेत. मंडप व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, दैनंदिन साफसफाई, शिबीराचा प्रचार प्रसार, रुग्णांसाठी वाहतुक व्यवस्था, भोजन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदींबाबत यावेळी माहिती घेण्यात आली. दिव्यांग रुग्णांना ने – आण करण्याची व्यवस्था शिबीरामध्ये आहे. तसेच, प्रत्येक प्रभागात भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन – ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
ऑनलाईन नोंदणीची सुविधा…
या शिबिरात सहभागी होण्यासाठी गरजू नागरिकांना दि. ५ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असून, रुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत ६१ हजारांवर रुग्णांची नोंदणी झालेली आहे. येत्या सप्ताहात लाखापेक्षा अधिक रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे. अटल महाआरोग्य शिबिरात राज्यासह देशभरातील नामवंत चिकित्सक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या तपासणी मोहिमेचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी 9850171111 आणि 7575981111 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले आहे.