अवीट गोडीच्या गीतांना श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘दिल की नजर से…’ या खास नववर्षानिमित्त १९५० ते २००० या पाच दशकातील सुपरहिट व्हिज्युअल हिंदी – मराठी गीतांचा नजराणा असलेल्या नि:शुल्क सांगीतिक मैफलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब जवळकर, विलास गधाडे, सुहास कुलकर्णी, उत्तम जाधव, ॲड. स्मिता शेटे, उषा शेटे, विलास खरे, नीलेश मोरे, राजेंद्र लढ्ढा, संदीप राजेशिर्के, अनिल दळवी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.



निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सांगीतिक मैफलीत विनायक कदम, नंदकुमार कांबळे, शैलेश घावटे, शुभांगी पवार, नेहा दंडवते, स्वाती भागवत, सुहासिनी कंझरकर, सुचिता शेटे – शर्मा, अमिता जाधव – कदम, अरुण सरमाने, प्रवीण पोलकम, मल्लिकार्जुन बनसोडे, अभिमान विटकर, चंद्रकांत हिवरकर, पूजा जैन या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून कृष्णधवल ते सप्तरंगी चित्रपटांतील तसेच चित्रपटसंगीतातील सुवर्णकाळाची स्वरानुभूती रसिकांना दिली. त्यात “तुने ओ रंगिले…” , “सासों की जरूरत हैं जैसें…” , “ले गयी ले गयी…” , “तुमसे मिलने की तमन्ना हैं…” , जादू हैं नशा हैं…” , “पान खाये सैंय्या हमारे…” अशा एकल गीतांनी मैफलीत रंग भरले जात असतानाच अतिशय तन्मयतेने सादर केलेल्या “जाती हूँ मैं…” , “छूप गये सारे नजारे…” , “जिस का मुझे था इंतजार…” , “तुम से मिलने की तमन्ना हैं…” , “कभी भुला कभी याद किया…” अशा अवीट गोडीच्या युगुलगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले; तर “आती रहेंगी बहारे…” या बहारदार गीताने खरोखरच बहार आणली. “माळ्याच्या मळ्यामंदी…” , “अश्विनी ये ना…” , “चोरीचा मामला…” या मराठमोळ्या धमाल युगुलगीतांनी मैफलीत वेगळीच रंगत आणली. “दिल की नजर से…” या मैफलीच्या शीर्षकगीताचे अप्रतिम सादरीकरण रसिकांनी खूप भावले; तर “यम्मा यम्मा…” या लोकप्रिय गीताचे दमदार सादरीकरण श्रोत्यांना इतके भावले की, त्याला वन्स मोअरची प्रचंड दाद मिळाली.

कार्यक्रमाच्या दरम्यान दिशा सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष संतोष बाबर आणि माजी कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी नंदकुमार कांबळे यांचे अभीष्टचिंतन करून त्यांना सन्मानित केले
विनायक कदम, नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. सचिन शेटे, सानिका काबंळे, साक्षी भिंगारे, अक्षदा यादव यांनी विशेष साहाय्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण केले. आकाश गाजुल यांनी छायाचित्रण केले. अरुण सरमाने यांनी निवेदन केले.








