पीएमआरडीए आयुक्तांनी घेतल्या सदनिकाधारकांच्या भेटी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून विकास कामांची आखणी करत पीएमआरडीएच्या गृह प्रकल्पातील अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. पीएमआरडीएअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पांसह भूखंडाची पाहणी करत त्यांनी सदनिकाधारकांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.



पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत पेठ क्रमांक १२ येथे गृहप्रकल्प फेस १ आणि फेस २ उभारण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांना महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी भेट देत नुकतीच कामाची पाहणी केली. यादरम्यान पूर्वीच्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांच्या अडचणी लक्षात घेत नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पात त्या राहणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकारी यांच्यासह ठेकेदार यांना दिले. यादरम्यान पहिल्या प्रकल्पातील पेठ क्रमांक १२ येथील सदनिकांधारकांशी संवाद साधला. येथील सदनिकांधारकांच्या प्राप्त झालेल्या बहुतांश अडचणी यंत्रणेच्या माध्यमातून दूर करण्यात आल्या आहे.

नागरिकांच्या भेटी आयोजित करा
पीएमआरडीएअंतर्गत सध्या पेठ क्रमांक 12 येथे गृहप्रकल्प फेज १ आणि फेज २ यांचे काम सुरू आहे. या ठिकाणची कामे अपेक्षित गतीसह दर्जेदार होत असल्यामुळे नागरिकांना ते पाहता यावे, यासाठी त्यांच्या भेटी आयोजित करण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. यासाठी विविध भागातील नागरिकांना संबंधित गृहप्रकल्प पाहता यावा, यासाठी आगामी काही दिवसात विशेष बसची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासह नागरिकांच्या सूचनांची नोंद घेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे निर्देश महानगर आयुक्त यांनी दिले.








