ताज्या घडामोडीपिंपरी

युवा गायक विराज जोशी, बासरी वादक पं. हिमांशू नंदा आणि शास्त्रीय गायिका गायत्री जोशी यांनी जिंकली रसिकांची मने

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कलाश्री संगीत महोत्सवाचा दुसरा दिवसही रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गाजला. महोत्सवात दुसऱ्या दिवशी युवा गायक विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन, सुप्रसिद्ध बासरी वादक पं. हिमांशू नंदा यांचे बासरी वादन आणि गायत्री जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांची मने जिंकली.
नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे सुरू असलेल्या कलाश्री संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी स्व. पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी राग मधुवंतीमध्ये मधुबन में शाम ही विलंबित एकतालातील बंदिश सादर केली. तसेच मध्यलय तीनतालमध्ये ‘उन्हीं से मोरी लगन लागी रे’ सादर केले. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांनी संगीतबद्ध केलेले ‘दान करी रे गुरुधन अती पावन’ हे नाट्यगीत, तसेच राम रंगी रंगले हे भजन गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना हार्मोनियमवर अविनाश दिघे यांनी, तबल्यावर पांडुरंग पवार यांनी, तानपुऱ्यावर दिगंबर शेडुळे व किशोर भिस्ते यांनी साथसंगत केली.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक हिमांशू नंदा यांनी मध्यलय ताल मत्तमध्ये राग सरस्वतीमधील रचना लयकारी करत सादर केली. राग हंसध्वनीमध्ये मध्यलय तीनताल व द्रुत एकतालमध्ये रचना सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. याबरोबरच तबला व बासरीची जुगलबंदी टाळ्या घेऊन गेली. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार यांनी, तर तानपुऱ्यावर धनंजय देशपांडे यांनी साथसंगत केली.
दुसऱ्या दिवसाचा समारोप विदुषी गायत्री जोशी यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मारूबिहाग घेत विलंबित एकतालमध्ये कल नाही आये बंदिश सादर करीत रसिकांना खिळवून ठेवले. द्रुत लयीत तीनतालात ‘मोरे नैनवा तरस गये’ ही बंदिश, तसेच राग मारुबिहागमधील बंदिश ‘जागू मैं सारी रैना बलमा’ आणि भैरवीमध्ये ‘पनघट पे जल भरन री मैं कैसे जाऊ’ बंदिश सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर अजिंक्य जोशी यांनी, हार्मोनियमवर अमेय बीचू यांनी, तर तानपुरा व स्वरसाथ आरुषी जोशी व भक्ती पवार यांनी साथसंगत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button