पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साजरा होणार ‘पर्पल जल्लोष – उत्सव दिव्यांगांचा’


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने दिव्यांगांसाठी आयोजित केला जाणारा भारतातील पहिला उत्सव



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने पर्पल जल्लोष –दिव्यांगांचा महाउत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा तीन दिवसीय महोत्सव चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शनी केंद्र येथे १७ , १८, १९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. भारतातील कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणारा हा दिव्यांगांसाठीचा पहिलाच भव्य उत्सव असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी उचललेले एक अग्रगण्य पाऊल असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

पर्पल जल्लोष हा महोत्सव दिव्यांगांची प्रतिभा आणि त्यांच्या नवकल्पनांना वाव देणारा तसेच दिव्यांगांच्या क्षमतामध्ये वाढ करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या महोत्सवाचा उद्देश सामाजिक विकासातील अडथळे दूर करण्यास चालना देणे, दिव्यागांबाबत समाजात असलेल्या प्रचलित विचारांविषयी प्रबोधन करणे, दिव्यांग व्यक्तीं विषयी समाजात असलेले नकारात्मक समज बदलण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांचे सर्वांगीण समावेशन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा हेतू असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.
पर्पल जल्लोषचे ठळक वैशिष्ट्ये
सहाय्यक साधने आणि तंत्रज्ञान एक्स्पोचे आयोजन
या उत्सवामध्ये दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्स, विविध कार्पोरेट कंपन्या आणि विविध संस्था सहभागी होणार आहेत. याठिकाणी दिव्यांगांबाबतच्या सेवांची माहिती देणारे स्टॉल्स उभारणार असून प्रदर्शने देखील भरवली जाणार आहेत. सहभागी कंपन्याकडून दिव्यांगांसाठीच्या नवीन कल्पना, तंत्रज्ञान प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. याशिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिव्यांग व्यक्तींसह इतर नागरिकांना व्हावी यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत. शिवाय दिव्यांगांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात येणार असून त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची नोंदणी केली जाणार आहे.
चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन
पर्पल जल्लोष महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या तसेच विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि सर्जनशील कौशल्याचे प्रदर्शन तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलामंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग नृत्य, गायन, अभिनय, गझल, कविता साहित्य संमेलन, अभिनय,फॅशन शो यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच दिव्यांगांच्या जीवनावर आधारित लेखन, साहित्य त्यांच्या प्रेरणादायी कथा आणि प्रवासाचा उलगडा करणारे विशेष सत्र देखील याठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमच्या ठिकाणी दिव्यांगांच्या स्थानिक संस्थाकडून खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून ते स्टॉल्स दिव्यांग व्यक्ती चालवणार आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून चौपाटीवर काम करणाऱ्या सर्व दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळेल, तसेच ग्राहकांना रुचकर व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
पर्पल जल्लोष महोत्सवात विविध क्षेत्रातील कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संशोधक आणि नवकल्पक विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी सोयीस्कर पद्धतीने आवश्यक साधनसामग्री आणि समावेशक समाज निर्माण करण्याचा उद्धेश साध्य करण्यासाठी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (HMIL) या कंपनीने नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘समर्थ बाय ह्युंदाई’ हा उपक्रम सुरू केला. ‘मोबिलिटी’ म्हणजे फक्त कार किंवा वाहतूक व्यवस्था नसून, मानवजातीच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक घटकाला संधींचे दरवाजे खुले करून समान अधिकार प्राप्त करून देण्यासाठी ह्युंदाई हा कृतीशील प्रयत्न करीत असून या विचाराने कंपनीने “पर्पल जल्लोष २०२५” साठी प्रायोजकत्व स्वीकारले आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.








