राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध


पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवारपासून (१० जानेवारी) ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. दरवर्षीच्या १८ मार्च या कालावधीत होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा काही दिवस लवकर परीक्षा होणार आहे. कुलाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र राज्य मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेशपत्रावरील छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा प्रवेशपत्राची मुद्रित प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असे नमूद करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.

प्रवेशपत्रातील दुरुस्ती ऑनलाइन, शुल्क आकारणी
प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख अशा दुरुस्त्या करायच्या असल्यास त्या ऑनलाइन पद्धतीने करायच्या आहेत. त्यासाठी दुरुस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी सादर कराव्यात. विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर सुधारित प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत. विषय, माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात संपर्क साधून दुरुस्त्या कराव्यात.








