ताज्या घडामोडीपिंपरी
“वैदिक हिंदुधर्मात अस्पृश्यतेला स्थान नाही!” – ॲड. सतिश गोरडे


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “वैदिक हिंदुधर्मात अस्पृश्यतेला कोणतेही स्थान नाही!” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी पुणे येथे व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील तीन दिवसीय सामाजिक समरसता अभियान यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी ॲड. सतिश गोरडे बोलत होते. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज केतन साळवे यांच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सामाजिक समरसता प्रमुख निखिल कुलकर्णी, राहुल विभूते, धनंजय गायकवाड, विजय कांबळे, हरीश वाल्मीकी, प्रथमेश परासर, अविनाश तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, “हिंदू धर्मात कधीही उच-नीच प्रमाण सापडत नाही. हिंदू तत्त्वज्ञान हे जगात श्रेष्ठ आहे; परंतु मोगल आणि नंतर ब्रिटिशांनी देशात जाणीवपूर्वक जातिभेद अन् अस्पृश्यतेची भावना पसरवली. त्यामुळेच नंतर हिंदुधर्मात तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांत भूल होत गेली. अस्पृश्यता आणि उच्चनीचतेचा भाव हा विचारातून आणि व्यवहारातून देखील संपला पाहिजे. आपल्या राष्ट्रातील संतांनी हिंदूंना परस्परांचे बंधू म्हटले आहे आणि म्हणूनच विश्व हिंदू परिषद, “हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिन्दू पतितो भवेत्” अर्थात सर्व हिंदू ही एकाच मातेची लेकरे असून, कोणताही हिंदू आता पतित असणार नाही; हेच ब्रीद वाक्य घेऊन पुढे चालत आहे. समाजामध्ये जन-जागरण करून सामाजिक ऐक्याच्या माध्यमातून सनातन राष्ट्र, कन्या-भगिनी, मंदिर-संत यांची रक्षा करणे, सामाजिक व्यवहारातून अस्पृश्यता आणि उच्चनीचता संपवणे, याद्वारे समर्थ आणि समरस राष्ट्राची निर्मिती करणे हा उद्देश समोर ठेवून, विश्व हिंदू परिषद देशभरामध्ये समरसता यात्रेचे आयोजन करीत आहे. या यात्रेचे आणि अर्थातच समरस हिंदू समाज रचनेचे स्वागत करावे!” असे आवाहन त्यांनी केले.
किशोर चव्हाण आपल्या मनोगतातून म्हणाले की, “मनामनांत झालेले भेद दूर करण्याचे काम सामाजिक समरसता अभियान यात्रेच्या माध्यमातून करीत आहे. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी गंजपेठेतील तालमीच्या माध्यमातून चापेकर बंधू, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, उमाजी नाईक असे अनेक क्रांतिकारक अन् नेते यांना प्रशिक्षण देऊन घडविले. क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी समाजासाठी आपले आयुष्य समर्पित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सामाजिक ऐक्यासाठी जीवन समर्पित केले. सुमारे दोनशे मंदिरांची उभारणी करणारे अशोकजी सिंघल यांचेही हिंदुधर्मासाठी महत्त्वाचे योगदान आहे. ‘अस्पृश्यता हा देशाला लागलेला कलंक आहे’ अशी बाळासाहेब देवरस यांची भूमिका होती!”
निखिल कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. ॲड. संकेत राव यांनी सूत्रसंचालन केले. राहुल विभूते यांनी आभार मानले.








