ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
पीसीईटी आणि न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार


पीसीईटी शैक्षणिक समूहातील विद्यार्थी – प्राध्यापकांना मिळणार उच्च शैक्षणिक संधी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी), पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एनझेडबीसीसीआय) यांच्यातील शैक्षणिक सामंजस्य करारामुळे प्राध्यापक, विद्यार्थ्यांना संशोधन, इंटर्नशिप याबरोबरच न्युझीलंड मधील पर्यटन आणि आर्थिक विकास अभ्यासाची संधी मिळाली आहे. तसेच एनझेडबीसीसीआयच्या भविष्यातील प्रकल्प, आंतरराष्ट्रीय योजनांमध्ये पीसीईटीच्या विद्यार्थी, प्राध्यापकांना सहभागी होता येईल. यामुळे रोजगारभिमुख शैक्षणिक प्रगतीला तसेच युवा उद्योजकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय वृद्धीसाठी चालना मिळेल, असे प्रतिपादन न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष महेश बिंद्रा यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी), पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एनझेडबीसीसीआय) यांच्या मध्ये सोमवारी (दि.६) शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. निगडी येथील पीसीईटीच्या कार्यालयात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पुणे बिझनेस स्कूलचे संचालक डॉ. गणेश राव, डॉ. मिनाक्षी त्यागी, अंजली गुगळे, राजू वाघमारे आदी उपस्थित होते.
महेश जयचंद बिंद्रा हे भारतीय वंशाचे असून ते न्यूझीलंड मध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी २०१४ आणि २०१७ मध्ये न्युझीलंड संसदेत प्रतिनिधित्व केले. पीसीईटी आणि एनझेडबीसीसीआय शैक्षणिक करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील उच्च दर्जाचे शिक्षण व रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. पीसीईटी गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासक्रमांत करत आहे. अल्पावधीतच पीसीईटीने आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. जगातील ३३ पेक्षा अधिक विद्यापीठे, संस्था यांच्या बरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले. युरोपियन अभ्यास विभागाच्या प्रमुख डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी स्वागत केले. डॉ. गणेश राव यांनी आभार मानले.








