अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड येथे अनागोंदी कारभार पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड ता. हवेली येथे नवीन तहसीलदार श जयराज देशमुख व नायब तहसीलदार डॉ. मनीषा माने-लोंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून सदर ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कामकाज हे संथ गतीने चालत असल्याच्या अनेक तक्रारी वकील व सर्व सामान्य नागरिक यांच्या कडून येत असलेबाबत तक्रार पिंपरी चिंचवड अँडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान सचिव अॅड. उमेश खंदारे यांनी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांचेकडे करण्यात आली.



बार असोसिएशन तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात सदर कार्यालयात एखादे प्रकरण आदेशासाठी बंद करण्यात आल्यावर सदर प्रकरणात तत्काळ आदेश पारित होणे गरजेचे असताना ५-५ महिने आदेश पारित केले जात नाहीत. परिणामी, न्याय मिळण्यास दिरंगाई तर होते व यातून त्या पक्षकाराला व त्यांचे वकिलांना अपर तहसील कार्यालयाला हेलपाटे मारावे लागतात त्याचबरोबर सदर ठिकाणचे कर्मचारी हे वकील व नागरिकांशी हुज्जत घालणे, उद्धटपणे वागणे, प्रश्नाची उत्तरे न देणे, कामकाजात एकसूत्रता नसणे, मोठ्या प्रमाणत भ्रष्ट्राचार, पैसे घेतल्याशिवाय काम न करणे, आम्ही सांगू ते ऐकावेच लागेल, तारखा देत असताना जाणीवपूर्वक उशिराच्या तारखा देणे, प्रकरणे प्रलंबित ठेवणे, नियमबाह्य कामे करणे, उशिरा आदेश पारित करणे, माहिती अधिकारातील माहिती जाणीवपूर्वक उपलब्ध करून न देणे, माहिती उपलब्ध असताना जाणीवपूर्वक शेवटच्या दिवशी देणे किंवा काहीतरी कारण देत ती नाकारणे, सदर कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला, वकील यांच्यासाठी बसण्याची पुरेशी व्यवस्था नसणे, शौचालय नसणे अश्या अनेक समस्यांना वकील व नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचे तक्रार अर्जात म्हंटले आहे. त्याचबरोबर संबंधित त्यांना तात्काळ सूचना करीत कार्यपद्धतीत बदल करून लोकाभिमुख प्रशासन देण्याची मागणी यावेळी उपस्थित वकिलांमार्फत करण्यात आली.

यावेळी पिंपरी चिंचवड अँडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अॅड. गौरव वाळुंज, सचिव अँड. उमेश खंदारे, मा. सचिव अँड. धनंजय कोकणे, अँड. मंगेश खराबे आदी उपस्थित होते.








