पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा पहिला दिवस उत्साहात संपन्न


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बलिदान बाबू गेनूचे, अवयवांची सभा, दिनूचे बील (संस्कारक्षम नाटिका), गंगी मुंबईला हरवली अशा विविध समाजप्रबोधनात्मक, आरोग्य जागरूकता आणि मुलांमध्ये संस्काराची भावना रुजविणाऱ्या नाटकांनी सजलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



पिपंरी चिंचवड महानगरपालिका क्रिडा विभागाच्या वतीने २ जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ दरम्यान आंतरशालेय कला व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये आजपासून आंतरशालेय एकांकिका स्पर्धेस सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळेगुरव येथे सुरूवात झाली. या स्पर्धेमध्ये ३ व ४ जानेवारी रोजी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे कलागुण पाहायला मिळणार असून आज झालेल्या एकांकिका स्पर्धेत भोसरी येथील श्रीराम विद्या मंदीर, पिंपरी येथील भाटनगर मनपा शाळा, निगडी येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय, चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकांकिका स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कलेचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांना त्यांच्या शिक्षकांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले.

नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या शाळांनी प्रकाशयोजना, नेपथ्य आणि रंगमंच व्यवस्थापन अशा सर्वच गोष्टींवर विशेष लक्ष दिले होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना नाट्यकलेत प्राविण्य मिळविण्याची संधी तर उपलब्ध झालीच शिवाय समाजातील विविध ज्वलंत विषय सर्वांसमोर मांडण्याची प्रेरणा देखील मिळाली. यावेळी शाळा, शिक्षक आणि पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उदंड प्रतिसाद दिला.
कोट
पिंपरी चिंचवड महापालिका क्रिडा विभागाच्या वतीने आयोजित आंतरशालेय नाट्यस्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना समाजातील ज्वलंत प्रश्नांचा सखोल अभ्यास करण्याची आणि त्यांच्यावर आधारित कथा सादर करण्याची संधी मिळाली आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाट्यकलेच्या कौशल्यासह सामाजिक बांधिलकीची जाणीवही निर्माण होत आहे.
– रेश्मा बनसोडे, शिक्षिका, सरस्वती माध्यमिक विद्यालय, निगडी
कोट
आंतरशालेय नाट्यस्पर्धा ही विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सर्जनशील विचारांना आणि कलागुणांना वाव देणारी एक अतिशय महत्त्वाची संधी आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी समाजातील समस्यांवर प्रकाश टाकत त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न केला आहे, जो खूपच प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांमुळे रंगभूमीच्या ज्ञानासोबत विद्यार्थ्यांमध्ये समाजासाठी जबाबदारीची भावना देखील विकसित होण्यास मदत होत आहे. अशा स्पर्धा त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरू शकते.
– किशोरी कांदळकर, शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल, चिंचवड
महापालिकेच्या वतीने २ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन
· ३ व ४ जानेवारी २०२५ रोजी एकांकिका स्पर्धा (स्थळ – नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी)
· ५ व ६ जानेवारी २०२५ रोजी वाद्य वादन स्पर्धा (स्थळ – भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी, निगडी)
· ७ जानेवारी २०२५ रोजी शास्त्रीय गायन स्पर्धा (स्थळ – भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी, निगडी)
· ८ व ९ जानेवारी २०२५ रोजी लेझिम स्पर्धा (स्थळ – स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, कृष्णानगर, चिखली)
· १० व ११ जानेवारी २०२५ रोजी सुगम संगीत स्पर्धा (स्थळ – भारतरत्न पंडित भीमसेन सोझी संगीत अकादमी, निगडी)
· १३ व १४ जानेवारी २०२५ रोजी समूहगीत स्पर्धा (स्थळ – टाऊन हॉल नाट्यगृह, चिखली, नेवाळे वस्ती)
· १५ व १६ जानेवारी २०२५ रोजी लोकनृत्य स्पर्धा (स्थळ – टाऊन हॉल नाट्यगृह, चिखली, नेवाळे वस्ती)








