ताज्या घडामोडीपिंपरी
सदाबहार गीतांनी दिला चिरतारुण्याचा प्रत्यय


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “ए शाम मस्तानी…” अशा जुन्या हिंदी – मराठी सदाबहार चित्रपटगीतांच्या साभिनय सादरीकरणातून ज्येष्ठांनी आपल्या चिरतारुण्याचा प्रत्यय यमुनानगर, निगडी येथील रसिकांना दिला. आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या दुसर्या वर्धापनदिनानिमित्त ‘जाने कहॉं गये वो दिन…’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते, त्याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी माजी नगरसेवक उत्तम केंदळे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, सुमन पवळे, कमल घोलप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा आढी, गिरीश देशमुख, आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष भानुदास कदम, सचिव कचरू जगदाळे, सहसचिव माणिकराव माने, खजिनदार श्रीकृष्ण पुरोहित, सहखजिनदार बाळकृष्ण ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुलभा उबाळे यांनी आपल्या मनोगतातून, “माणूस वयाने ज्येष्ठ होतो पण मनाने तरुण असतो, याचा येथे अनुभव घेतला. स्थानिक कलाकारांना नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे!” असे आवाहन केले. अण्णा आढी यांनी, “कलेला उत्तेजन हे ज्येष्ठांसाठी टॉनिक आहे!” असे मत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते सुधीर जपे, गीतांजली केळकर, कविता तरडे, मुराद काझी या व्यावसायिक गायक कलाकारांसोबत सुनील साठे, प्रकाश भोसले, रत्नाकर नागपुरे, बाळकृष्ण घोंगडे आणि बासरीवादक प्रकाश कोटणीस या आधार ज्येष्ठ नागरिक संघातील हौशी कलाकारांना सन्मानित करण्यात आले. तसेच वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ सभासदांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. नवीन वर्षानिमित्त सर्व उपस्थितांना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.
‘जाने कहॉं गये वो दिन…’ या सांगीतिक मैफलीत “आज मौसम बडा…” , “वादियॉं मेरा दामन…” , “आप की नजरोंने समझा…” , “एक प्यार का नगमा हैं…” , “मैं कही कवी न बन जाऊ…” , “मेरे सपनों की रानी…” , “इशारों इशारों में…” आणि “हे चिंचेचे झाड…” , “सूर तेचि छेडिता…” अशा एकाहून एक सरस गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विशेषत: व्यावसायिक कलाकारांइतकेच हौशी कलाकारांचे सादरीकरण ही रसिकांसाठी कौतुकाची अन् सुखद आश्चर्याची बाब ठरली. त्यामुळे प्रत्येक गीताला रसिकांची समरसून दाद मिळाली. मुराद काझी यांनी मैफलीचे बहारदार निवेदन केले. दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजीमहाराजांच्याप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. श्रीकृष्ण पुरोहित यांनी अहवालवाचन केले. ह. भ. प. एकनाथ उगले, माणिकराव माने, कचरू जगदाळे यांनी संयोजनात सहकार्य केले. नारायण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बाळकृष्ण ठोंबरे यांनी आभार मानले.








