करसंकलन विभागाकडून दोन दिवसात तब्बल १२८ मालमत्ता जप्त..!


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून तीन लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्ता प्राध्यान्याने जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, विभागाने शनिवार, दिनांक, 28 डिसेंबर व रविवार, दिनांक, 29 डिसेंबर यादिवशी सुद्धा जप्तीची धडक मोहिम राबविली. यामध्ये शनिवारी 65 मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून रविवारी 63 मालमत्तावर जप्तीची कारवाई करण्यात आली.



करसंकलन विभागाची जप्तीच्या धडक मोहीम लक्षात घेऊन आणि आपली मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून शनिवारी 139 मालमत्ता धारकांनी 2 कोटी 91 लाख 13 हजार 770 तसेच रविवारी 89 मालमत्ताधारकांनी 1 कोटी 80 लाख 24 हजार 13 इतका एकूण तब्बल 4 कोटी 71 लाख 37 हजार 783 रुपयांच्या रकमेचा मालमत्ता कराचा भरणा केला. सदरची मोहिम सात जानेवारीपर्यंत सलग राबविण्याय येणार असून 1 लाखाहून अधिक थकबाकी असणारी एकही बिगरनिवासी ,औदयोगिक आणि मिश्र मालमत्ता जप्ती कारवाईमधून वगळली जाणार नाही.

शहरातील जागरूक नागरिकांनी कायम जागरूकपणे कराचा भरणा करून शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. महानगरपालिकेने नागरिकांना मालमत्ता करामध्ये विविध सवलती दिल्या असून नागरिकांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला आहे. आता थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा करून मालमत्ता जप्तीची कटू कारवाई टाळावी.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
नागरिकांनी कर भरण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध माध्यमातून वेळोवेळी आवाहन करण्यात आले. अद्यापही ज्या नागरिकांनी कर भरला नाही अशा नागरिकांना आपली मालमत्ता जप्तीस पात्र असल्याची जप्ती पूर्व नोटीस सुद्धा पाठविण्यात आली. तरी अद्याप ज्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला नाही अशा मालमत्तावर मालमत्ता जप्तीची कारवाईची धडक मोहिम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी थकीत कराचा त्वरित भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी.
– प्रदीप जांभळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त(1), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
शनिवार व रविवार यादिवशी राबविण्यात आलेल्या जप्ती मोहिम यापुढे तीव्र मोहीम स्वरूपात सतत 7 जानेवारीपर्यंत चालूच राहणार असून 1 लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या 100 % बिगरनिवासी, ओद्योगिक, मिश्र मालमत्तावर प्राधान्याने मालमत्ता जप्तीची कारवाई करणेत येणार असून यामधून एकही मालमत्ता वगळण्यात येणार नाही. करसंकलन विभागाकडून अन्य कामास प्राधान्य न देता थकबाकीदारांकडून रक्कम वसुलीस /जप्ती मोहिमेस सर्वाधिक प्राधान्य देणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी आपल्या कराचा ऑनलाईन स्वरूपात भरणा तात्काळ करून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी.तसेच जप्त कार्यवाहीचे वेळेस पुढील दिनांकाचे धनादेश कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत.
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका








