चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
रतन टाटा यांना भारतरत्न द्यावे, टीम पिंपरी चिंचवडची स्वाक्षरी मोहीम


पिंपरी चिंचवड शहरात रतन टाटा यांचे स्मारक उभारावे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय उद्योग विश्वाचा पाया रचण्यात टाटा कुटुंबीयांचे अतुलनीय योगदान आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात टाटा मोटर्स सह टाटा कंपनीच्या इतर शाखांमुळे शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. या शहराच्या औद्योगिक पायाभरणीमध्ये उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे. कामाप्रति त्यांची निष्ठा आणि आपल्या कामगारांवर असणारे त्यांचे प्रेम यामुळे आज लाखो लोकांना रोजगार निर्माण झाला आहे.
स्व. रतन टाटा यांचे उद्योग विश्वाविषयी असणारे कार्य घरोघरी पोहोचायला पाहिजे. यासाठी त्यांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातून “टीम पिंपरी चिंचवड” च्या वतीने करण्यात येत आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्वर्गीय रतन टाटा यांचे तैलचित्र आणि शहरामध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून स्मारक उभारावे या मागणीसाठी टीम पिंपरी चिंचवडचे समन्वयक जयदीप उमा गिरीश खापरे यांनी गुरुवार दि. १९ डिसेंबर पासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. लाखो नागरिकांचे हे स्वाक्षरीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात येणार आहे.
तसेच शनिवारी (दि. २८) स्वर्गीय रतन टाटा यांच्या प्रथम जयंती निमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सायंकाळी सहा वाजता रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रतन टाटा यांचे कार्य घरोघरी पोहोचावे यासाठी टीम पिंपरी चिंचवडच्या वतीने रतन टाटा यांचे छायाचित्र असणारी फ्रेम शहरातील दहा हजार कुटुंबांना घरोघरी जाऊन भेट देण्यात येणार आहे अशी माहिती टीम पिंपरी चिंचवडचे समन्वयक जयदीप उमा गिरीश खापरे, सुशांत मोहिते, सोमनाथ काळभोर, अनिरुद्ध संकपाळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे.








