देशाने अर्थशास्त्रातील सिंह गमावला! भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा


नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे वयाच्या ९२व्या वर्षी गुरुवारी रात्री कालवश झाले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थऋषी गमावला आहे. मनमोहन सिंग यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील व सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल.



प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले हाेते. उपचारादरम्यान रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. मनमोहन सिंग यांच्यामागे पत्नी गुरशरण कौर व तीन कन्या असा परिवार आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांनी दोनदा देशाचे पंतप्रधानपद भूषविले. गेल्या काही वर्षापासून ते प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्रस्त होते. त्यांना याआधी काही वेळा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

त्यांचे निधन झाल्याचे वृत्त कळल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस व खासदार प्रियांका गांधी, भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा हे एम्समध्ये पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहनसिंग यांच्या कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तानंतर कर्नाटक येथे बेळगाव येथे सुरु असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रद्द करण्यात आली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हे तातडीने बेळगावहून रवाना झाले व गुरुवारी मध्यरात्रीनंतर दिल्लीला पोहोचले.
डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने सारा देश शोकाकुल झाला आहे. कठीण परिस्थितीवर मात करून उच्चशिक्षण घेत ते विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांच्या विचारांचा देशाच्या आर्थिक धोरणांवर अमीट ठसा उमटला. मनमोहनसिंग पंतप्रधान व मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आम्ही नेहमी एकमेकांशी संवाद साधत होतो. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मनमोहन सिंग यांनी प्रचंड ज्ञान आणि सचोटीने भारताचे नेतृत्व केले. त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल समज देशाला प्रेरणा देत होती. मी एक मार्गदर्शक गमावला आहे – राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते








