ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्रमावळ
सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल घ्या शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना


जनतेचा सरकारवरील विश्वास उडू देऊ नका
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात नाही. तक्रारदाराला मानसिक त्रास दिला जातो. वाकड, हिंजवडी, काळेवाडी आणि सांगवी या पोलीस ठाण्यासंदर्भातील सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देण्याची सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. तसेच जनतेचा सरकारवरील विश्वास उडू देऊ नका असेही त्यांनी पोलिसांना सुनावले.
कौटुंबिक, मारहाण, विनाकारण त्रास देत असल्याबद्दल पोलीस ठाण्यात गेल्यास सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून दाद दिली जात नाही. तत्काळ गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. तक्रारदाराला धमकावले जाते. त्याच्याशी सौजन्याने संवाद साधला जात नसल्याचा अनेक तक्रारी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर खासदार बारणे यांनी तत्काळ पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली. वाकड, हिंजवडी, काळेवाडी आणि सांगवी पोलीस ठाण्याबाबतचा नागरिकांनी सांगितलेला कठू अनुभव आयुक्तांच्या कानावर घातला.
खासदार बारणे म्हणाले, पोलिसांना केवळ जमीन, खरेदी विक्रीच्या प्रकरणात रस आहे. त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही असे दिसते. शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गैरप्रकार घडत आहेत. सर्वसामान्य नागरिक तक्रार घेऊन आल्यास त्याची तत्काळ दखल घेतली जात नाही. अनेकवेळा तासनतास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जाते. मानसिक त्रास दिला जातो. वाकड, हिंजवडी, काळेवाडी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील चुकीच्या कारभाराच्या अनेक तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केल्या आहेत. हे पोलीस आयुक्तालयाला शोभा देणारे नाही. लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या नागरिकाबाबत फोन केल्यास संबंधित व्यक्तीला नाहक त्रास दिला जातो. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पोलीस अधिकारीच जबाबदार असल्याचे दिसून येते. तक्रारदाराला नाहक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ समज द्यावी.
जनतेचा सरकारवरील विश्वास उडू देऊ नका
राज्यातील जनतेने प्रचंड बहुमतासह महायुती सरकारवर विश्वास टाकला आहे. महायुतीचे सरकार जनतेचे सरकार आहे. त्यामुळे लोकाभिमुख कारभार झाला पाहिजे. जनतेचा सरकारवरील विश्वास कमी होईल असे वर्तन करू नये अशा सूचना खासदार बारणे यांनी पोलीस आयुक्तांना केल्या आहेत.
पोलिसांनी जमीन खरेदी-विक्री प्रकरणापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे. नागरिकांना विनाकारण त्रास देऊ नये. अन्यथा आक्रमक भूमिका घेतली जाईल.
श्रीरंग बारणे
खासदार








